माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखा
By Admin | Updated: December 13, 2015 00:41 IST2015-12-13T00:41:52+5:302015-12-13T00:41:52+5:30
जलसंपदा विभागाकडे असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी..

माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखा
मुनगंटीवारांचे निर्देश : नागपुरात पार पडली विशेष बैठक
चंद्रपूर: जलसंपदा विभागाकडे असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जलसंपदा विभागाला दिले. वनसभागृह नागपूर येथे माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती व सिंचन क्षमतेची पुनर्स्थापना करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, विभागीय आयुक्त अनूप कुमार, उपसचिव टाटू, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आर.एम. चव्हाण, अधिक्षक अभियंता गोसीखुर्द आर.एन. ठाकरे, अधिक्षक अभियंता जे.एम. शेख, अधिक्षक अभियंता आर.के. ढवळे, अभियंता राजेश सोनोने आदी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हयातील मामा तलावांच्या देखभाल दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद यापूर्वी करण्यात आली आहे. या कामाचे अचूक नियोजन करण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील १३२ मामा तलाव जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असून यासाठी निधीचे नियोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागाने १५ दिवसांत तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक तलावाची निविदा कधी निघणार, काम कधी होणार, याचा तपशिलवार अहवाल तयार करावा असेही त्यानी सांगितले. माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीचे मापदंड सुधारित करुन देण्यासंबधीचा शासन आदेश लवकरच काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
माजी मालगुजारी तलावात मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यानी केल्या. मत्स्य व्यवसायासाठी तलावातील पाणी राखून ठेवण्यासंबंधी नियोजन करावे. देखभाल दुरुस्ती झाल्यानंतर सिंचन वाढले पाहिजे, असे त्यानी सांगितले. मामा तलावातील गाळ प्राधान्याने काढावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
गोसेखुर्द धरणातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील तलावांमध्ये सोडण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. गोसेखुर्द तलावात भरपूर पाणीसाठा असून तो पूर्णपणे उपयोगात न आल्याने जास्तीचा साठा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पाच्या कालव्यात व माजी मालगुजारी तलावात भरुन देण्याची मागणी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केली आहे. यावर शनिवारी गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसह ना.सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत विस्तृत चर्चा केली. कशा पध्दतीने पाणी सोडता येईल , त्याचा किती गावांना फायदा होईल, या संबंधीचा गावनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले. पळसगांव आमडी उपसा सिंचन योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे. यासाठी त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. (प्रतिनिधी)