माजी मुख्यमंत्री नाईक यांचे स्मारक उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 00:39 IST2017-02-28T00:39:09+5:302017-02-28T00:39:09+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ...

माजी मुख्यमंत्री नाईक यांचे स्मारक उभारणार
सुधीर मुनगंटीवार : विविध विकास कामांचे भूमीपूजन
चंद्रपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सांस्कृतिक भवन, आर्थिकदृष्ट्या घटकातील मुलांना राहण्यासाठी वसतिगृह आणि सर्वसुविधांनीयुक्त स्मारक उभारण्याची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
जगद्गुरू संत सेवालाल महाराज जयंती व बंजारा समाजाचे महानायक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौकाजवळ रस्ता विकसित तसेच पथदिवे उभारणी या कामाचे भूमिपूजन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार नाना शामकुळे होते. याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त संजय काकडे, सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, अनिल फुलझेले, अशोक राठोड, श्याम राठोड, प्रवीण पवार यांची उपस्थिती होती. बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर शहरात अद्ययावत विविध प्रकल्प सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्मार्ट सिटीच्या धरतीवर स्मार्ट चंद्रपूर हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करून तो पूर्णत्वास नेण्याचा संकल्प जाहीर केला. याप्रसंगी बंजारा समाजातर्फे पालकमंत्री सुधीर मनुगंटीवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन अशोक राठोड, सुरेश पवार यानी दिले. त्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. प्रास्ताविक अशोक राठोड, संचालन प्रा.विश्वनाथ राठोड तर आभार सुरेश पवार यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)