हर... हर..२. महादेवचा गजर निनादला
By Admin | Updated: February 18, 2015 00:52 IST2015-02-18T00:52:24+5:302015-02-18T00:52:24+5:30
महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारपासून यात्रेला प्रारंभ झाला आहे. विविध ठिकाणांवरून भाविक यात्रेत सहभागी झाले असून ...

हर... हर..२. महादेवचा गजर निनादला
चंद्रपूर : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारपासून यात्रेला प्रारंभ झाला आहे. विविध ठिकाणांवरून भाविक यात्रेत सहभागी झाले असून आज पहाटेपासूनच भाविकांनी ‘हर... हर... महादेव’च्या गजरात मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा आयोजन समित्यांनी व्यवस्था केली असून भाविकांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनानेही यात्रा स्पेशल बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.
वरोरा : तालुक्यातील भटाळा गावाच्या टेकडीवर असलेल्या हेमाडपंंथी शिवमंदिरातील यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. ही जत्रा तीन दिवस चालणार आहे.
वरोरा शहरापासून १६ किमी अंतरावरील भटाळा गावानजकीच्या टेकडीवर हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराला कळस नाही. महाशिवरात्री पासून भटाळा गावातील मंदिरात तीन दिवसीय यात्रा भरत असते. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी गोपालकाल्याने यात्रेचा समारोप होतो. दर्शन घेण्याकरीता वरोरा, चिमूर, भद्रावती तसेच वर्धा जिल्ह्यातील गिरड, समुद्रपूर, हिंगणघाट, गडचिरोली, नागपूर येथील भाविक मोठ्या प्रमाणात येते आले. यात्रेकरुनकरीता वरोरा एसटी आगाराने तिन्ही दिवस विशेष बसगाड्यांची सोय केली आहे. या बसगाड्या भटाळा- वरोरा या मार्गावर फेऱ्या मारत असून काही बसेस व्हाया टेमुर्डा तर काही बसेस भटाळापर्यंत सोडल्या असल्याने भाविकांची सोय झाली आहे.
भाविकांना गरज पडल्यास आरोग्य सेवा तत्काळ मिळण्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसारचे आरोग्य पथक यात्रेत कार्यरत आहे. शहरी व ग्रामीण भागातील नागरिक खासगी वाहनाने भटाळा येथे येत असल्याने वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या दोन्ही बाजुस वाहन तळाची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी भटाळा गावात पहारा देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)