जिल्हा परिषद सभापतींना अखेर खातेवाटप
By Admin | Updated: November 10, 2014 22:40 IST2014-11-10T22:40:13+5:302014-11-10T22:40:13+5:30
जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप तसेच समिती सदस्यांची निवड दीर्घ कालावधीनंतर सोमवारी पार पडली. एक महिन्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड करण्यात आली.

जिल्हा परिषद सभापतींना अखेर खातेवाटप
चंद्रपूर : जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप तसेच समिती सदस्यांची निवड दीर्घ कालावधीनंतर सोमवारी पार पडली. एक महिन्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड करण्यात आली. याचवेळी सभापतींचीही निवड करण्यात आली होती. मात्र सभापतींच्या खातेवाटपाची प्रक्रिया रखडली होती. अनेक दिवसांपासून विभागांना सभापतिपद मिळाले नसल्याने काही प्रमाणात विकास कामांची गती मंदावली. मर्जीतील खाते मिळावे यासाठी भाजपातील काही सदस्यांचे रुसवे-फुगवे दूर झाल्यानंतर आज निवड प्रक्रिया पार पडली. मर्जीतील खाते मिळाले नसल्याने आज काही सभापतींमध्ये नाराजी आहे.
बांधकाम सभापतिपद मिळावे यासाठी देवराव भोंगळे, ईश्वर मेश्राम दोघेही प्रयत्नात होते. यासाठी जोरदार रस्सीखेचही झाल्याचे समजते. ज्या दिवशी सभापतींची निवड झाली तेव्हा मेश्राम तसेच भोंगळे या दोघांनीही बांधकाम खाते मिळणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली.
आज पार पडलेल्या सभापतींच्या खातेवाटपामध्ये देवराव भोंगळे यांना बांधकाम, तसेच शिक्षण खाते मिळाले आहे. ईश्वर मेश्राम यांना आरोग्य खाते देण्यात आले आहे.
शिक्षण तथा आरोग्य विभाग मिळावा, अशी उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांची इच्छा होती. तशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र त्यांना कृषी सभापतिपद देण्यात आले आहे. तर नीलकंठ कोरांगे यांना समाजकल्याणचा भार देण्यात आला आहे. सविता कुडे यांना महिला बालकल्याण खाते मिळाले आहे.
समिती सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. पाच जुन्याच पदाधिकाऱ्यांची समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. दिनेश चिटणुरवार यांनी शिक्षण समितीसाठी अर्ज सादर केला. यासाठी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात त्यांचा नंबर कटला.
माजी पदाधिकाऱ्यांपैकी संदीप गड्डमवार यांची जलव्यवस्थाप समिती सदस्य, संतोष कुमरे यांची अर्थ समिती, गुणवंतराव कारेकर शिक्षण समिती, अमृता सूर यांची बांधकाम समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)