बोझा असतानाही तलाठ्याने केला सातबारा कोरा
By Admin | Updated: March 16, 2015 00:48 IST2015-03-16T00:48:22+5:302015-03-16T00:48:22+5:30
चिमूर तालुक्यातील मदननापूर (तु.) यथील भूमापन क्रमांक ९६ आराजी १.०४ हेक्टर आर या शेतजमीनीच्या सातबाऱ्यावर बोझा असतानाही...

बोझा असतानाही तलाठ्याने केला सातबारा कोरा
खडसंगी: चिमूर तालुक्यातील मदननापूर (तु.) यथील भूमापन क्रमांक ९६ आराजी १.०४ हेक्टर आर या शेतजमीनीच्या सातबाऱ्यावर बोझा असतानाही मदनापूर साजाचे तलाठी भरत पगाडे यांनी सातबारा कोरा दाखवून शेतकरी योगेश थुटे यांच्यासह मासळ येथील सहकारी बँक शाखेचीही फसवणूक केली. आता अन्यायग्रस्त शेतकरी न्यायासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहे.
मदनापूर (तुकूम) येथील भूमापन क्रमांक ९६ आरजी १.०४ हेक्टर आर शेत जमीन काशिनाथ सीताराम हातभिडे यांच्या मालकीची होती. या शेतजमिनीवर मासळ येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतून एक लाख रुपये कर्जाची उचल केली.
कर्जाच्या बोझा असतानाही मतदनापूर तलाठी भरत पगाडे यांनी अर्थपूर्ण व्यवहार करुन बोझा नसल्याचा सातबारा त्यांना दिला. याच सातबारावरुन शेतकरी सीताराम हातभिडे यांच्याकडून ११ सप्टेंबर २०१२ ला ही शेत जमीन योगेश थुटे यांनी विकत घेतली. मात्र मंडळ अधिकारी नेऊलकर यांनी या जमीनीचा फेरफार करुन सातबारा घेतला असता, या सातबाऱ्यावर मासळ बँकेचे कर्ज असल्याचा बोझा चढवून सातबारा देण्यात आला. या सर्व प्रकरणामध्ये तलाठी भरत पगाडे यांनी मासळ सहकारी बँक शाखा व शेती विकत घेणारे योगेश थुटे यांची फसवणूक केली. त्यामुळे तलाठी पगाडे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्याची मागणी योगेश थुटे यांनी पत्रकार परिषदेतून केली.
शेतकरी योगेश थुटे यांनी मंडळ अधिकारी यांच्याकडून शेतीवरील बोझाचा सातबारा मिळताच, आपली फसवणूक झाल्याची तक्रार चिमूर तहसीलदारांकडे ३ नोव्हेंबर २०१४ ला केली होती. त्याअनुषंगाने तहसील कार्यालयाकडून थातूर-मातूर चौकशीचा फार्स करण्यात आला. मात्र अजुनही तलाठ्यावर कारवाई करण्यात आली नाही.
याच अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडेसुद्धा तक्रार दाखल केली. दरम्यान, त्यांनी तहसीलदारांना ५ नोव्हेंबर २०१४ ला कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र चार महिन्यांचा कालावधी होवूनसुद्धा वरिष्ठाकडून कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे महसूल अधिकारी फसवणूक करणाऱ्या तलाठ्याला अभय देत असल्याचा आरोप ेथुटे यांनी यावेळी केला. या प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा, अशी थुटे यांची मागणी आहे. (वार्ताहर)
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल
जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर चिमूर दौऱ्यावर आले असता अन्यायग्रस्त शेतकरी योगेश थुटे यांनी या प्रकरणाविषयी भेट घेवून त्यांच्यापुढे आपली विवंचना मांडली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना तलाठी भरत पगाडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन दोन दिवसात अहवाल देण्याच्या सूचना केल्या. मात्र अद्यापही तलाठ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.