मरणानंतरही येथे अस्वच्छतेचं दुखणं !
By Admin | Updated: November 3, 2015 00:22 IST2015-11-03T00:22:05+5:302015-11-03T00:22:05+5:30
‘स्वच्छ भारत, सुंंदर भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा आणि त्यानुसार प्रत्यक्ष कृती करण्याचा वसा भद्रावती नगरपरिषद प्रशासनाने घेतलेला दिसत नाही.

मरणानंतरही येथे अस्वच्छतेचं दुखणं !
मुख्य रस्ता अर्धवट स्वच्छ : भद्रावती शहर स्वच्छ म्हणायचे काय ?
भद्रावती : ‘स्वच्छ भारत, सुंंदर भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा आणि त्यानुसार प्रत्यक्ष कृती करण्याचा वसा भद्रावती नगरपरिषद प्रशासनाने घेतलेला दिसत नाही. शहरातील एकमेव मुख्य रस्ता तोही अर्धवट स्वच्छ करुन शहर स्वच्छ होत नाही. आजही भद्रावतीकर अस्वच्छतेत आपले जीवन घालवीत आहे. मरणानंतर देह घेऊन जाण्याच्या ठिकाणीही अस्वच्छता आहे. या अस्वच्छतेने मरणानंतरही पाठ सोडत नसल्याचे भद्रावतीकरांना अनुभवायला मिळत आहे.
भद्रावती नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या पिंडोनी स्मशानभृूमीची अस्वस्था पहाता त्या ठिकाणी आपल्या प्रिय जणाला अखेरचा निरोप घ्यावयास गेलेल्या अनेकांच्या तोंडून किती घाण ही प्रतिक्रिया निघते. मल्हारा आणि पिंकोनी या दोन स्मशानभूमीला अद्ययावत करण्याचे नगरपरिषदेचे प्रयत्न आहे. यातील पिकांनी स्मशानभूमीला जैन मंदिर प्रशासनाने आपल्याकडील काही जागा देऊन ती प्रशस्त व सर्व सुविधायुक्त करण्यासाठी सहकार्य केले त्या ठिकाणी जैन मंदिर प्रशासनाकडून सभागृह बांधण्यात आले आहे. नगरपरिषदेने भिंत बांधून त्या जागेला बंदिस्त केले. एकमेव असलेल्या लोखंडी दारातून त्या ठिकाणी प्रवेश केला जातो. त्या ठिकाणी तीन शवदाहिनी बांधण्यात आल्या आहेत. तसेच भगवान शंकराचा अर्धवट पुतळा आहे. सभा मंडपाच्या समोरील भागात पेविंग बॉक्स लावून हा भाग सुशोभित करण्यात आला. एवढे करुन नगरपरिषद प्रशासनाने जणू आपले कर्तव्य संपले, असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
आज त्या ठिकाणी अनेक भागात गवत आणि इतर झाडझुडपे वाढली आहेत. त्यामुळे जागा व्यापली गेली असून पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक ग्लॉसचा खच सर्वत्र पडलेला आहे. झाडांची झुकलेली पाने पडून परिसर अस्वच्छ झाला आहे. प्रियजनाला अग्नी देण्यापूर्वी त्याच्या आप्ताला आंघोळ करण्यासाठी तसेच मृताच्या चितेला पाणी देण्यासाठी तयार केलेली बोर आज कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहे. त्या ठिकाणी प्रसाधनाची व्यवस्था नाही. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)