शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 02:03 IST2016-08-21T02:03:54+5:302016-08-21T02:03:54+5:30
२०१५-२०१६ हे शैक्षणिक वर्ष संपून नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. मात्र बहुतेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज

शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयातच
विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत
परिमल डोहणे चंद्रपूर
२०१५-२०१६ हे शैक्षणिक वर्ष संपून नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. मात्र बहुतेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा केले नसल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. शिष्यवृत्ती अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी जिल्ह्यातील ७ हजार १५८ विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही महाविद्यालयातच पडून आहेत.
२०१५-२०१६ या शैक्षणिक सत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील ५९ हजार २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांच्या पडताळणीनंतर ४९ हजार १४१ अर्ज वैध ठरविण्यात आले. तर ६५० अर्ज नाकारण्यात आले. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ७ हजार १५८ अर्ज महाविद्यालस्तरावर प्रलंबित आहेत. महाविद्यालयांना अनेकदा सूचना देऊनही महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा केले नाहीत. त्यामुळे शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले नाही. परिणामी विद्यार्थ्यी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात ७९ कनिष्ठ महाविद्यालये, ८० वरिष्ठ महाविद्यालये, ३१ औद्योगीक प्रक्षिण संस्था, १२८ व्यावसायिक महाविद्यालये व ७४ इतर महाविद्यालये असे एकूण ३९२ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरुन अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा केली. समाजकल्याण विभागाने ३१ मार्चच्या आत शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा करण्याची सूचना महाविद्यालयांना केली होती. मात्र महाविद्यालयांनी त्याकडे दुर्लक्ष करीत शैक्षणिक वर्ष संपून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. तरीही शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा केले नाहीत. यामध्ये ओ.बी.सी विद्यार्थ्याचे ३ हजार ३०५ अर्ज, एस.बी.सी. विद्यार्थ्यांचे २१४ अर्ज, एसी.सी. विद्यार्थ्यांचे २ हजार ६०९, एन.टी. विद्यार्थ्यांचे १ हजार ३० अर्ज अजूनही महाविद्यालयातच आहेत.
विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरुन महाविद्यालयात जमा केले. मात्र बहुतेक महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा केले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळाली नाही. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा झाले. त्यातील बहुतेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली तर काही विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
मुदत वाढवूनही उदासिनता
मार्च महिन्यच्या अखेरपर्यंत शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण विभागात जमा करण्याची सूचना महाविद्यालयांना देण्यात आली होती. तरीही महाविद्यालयाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे ३० जूनला सर्व महाविद्यालयातील प्राचार्य व लिपिकांची सभा घेऊन प्रलंबित प्रस्ताव या कार्यालयाचे लिपीक लॉगिनला फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र त्याचीही दखल महाविद्यालयांनी घेतली नाही. त्यानंतर समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांकडे पत्रव्यवहार करून शिष्यवृत्ती अर्ज १५ आॅगस्टच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र अद्यापही शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांनी समाजकल्याण कार्यालयात सादर केले नाही.
महाविद्यालयाला वारंवार पत्र व्यवहार व फोन करून बी-स्टेंटमेंट व शिष्यवृत्ती अर्ज मार्च महिन्यापर्यंत जमा करण्याचे निर्देश दिले. मात्र मार्च महिना लोटल्यानंतरही अर्ज जमा न झाल्याने १५ आॅगस्टच्या आत ते जमा करण्याचे निर्देश दिले. मात्र तरीही महाविद्यालयांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे अर्ज जमा करण्यासाठी वैयक्तिक अर्ज महाविद्यालयांना पाठविले आहेत. तसेच ज्या अर्जांची पडताळणी झाली आहे., त्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येईल.
पी.जी.कुलकर्णी सहायक आयुक्त, समाजकल्याण चंद्रपूर.