स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही ‘ती’गावे पितात नाल्यातील पाणी
By Admin | Updated: August 15, 2016 00:32 IST2016-08-15T00:32:40+5:302016-08-15T00:32:40+5:30
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील अनेक गावे ...

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही ‘ती’गावे पितात नाल्यातील पाणी
जिवती तालुका विकासापासून कोसोदूर
आमदार, खासदारांना पडला विसर
फारुख शेख पाटण
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील अनेक गावे स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही नाल्यातील पाण्यावर आपली तहान भागवित आहेत. गावांमध्ये अनेक समस्या आवासून उभ्या असताना खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी संपूर्ण तालुक्याकडे दुर्लक्ष चालविले आहे.
जिवती तालुक्यातील मरकागोंदी ग्रामपंचायत अंतर्गत घाटराई गुडा येथे ३५ कुटुंब वास्तव्यास आहेत. गावाची लोकसंख्या ९० आहे. ५० ते ६० वर्षांपासून येथील नागरिक गावात राहतात. या गावात जाण्याकरिता त्यांना पक्का रस्ता नाही. विद्युत पुरवठा आहे. परंतु तो बंद पडला तर सहा-सहा महिने येत नाही. गावात पिण्याच्या पाण्यासाठी एकही बोअरवेल किंवा विहीर नाही. गावात नळयोजना आहे. पण ती अनेक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून गावातील नागरिक नाल्यातील पाणी नाईलाजाने पितात, अशी व्यथा ‘लोकमत’शी बोलताना गावपाटील भाऊ पग्गू आत्राम यांनी दिली. गेल्या आठवड्यात तालुक्यातील पल्लेझरी येथे विहीर व बोअरवेलचे पाणी प्राशन केल्याने डायरिया होऊन तीन व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. या गावातपासून एक किमीवर घाटराईगुडा आहे. तेथील लोकं नाल्यातील पाणी पीत आहेत. त्याकडे मात्र शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.