देवाडा येथे अंनिसचा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम
By Admin | Updated: April 7, 2016 00:43 IST2016-04-07T00:43:45+5:302016-04-07T00:43:45+5:30
गट ग्रामपंचायत देवाडा आणि दिपशिखा महिला बचत गट, ग्राम महासंघ देवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ...

देवाडा येथे अंनिसचा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम
चंद्रपूर : गट ग्रामपंचायत देवाडा आणि दिपशिखा महिला बचत गट, ग्राम महासंघ देवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण मेळाव्यामध्ये महाराष्ट्र अंनिसचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम. जाधव यांचा जादूटोणाविरोधी कायदा व तथाकथित चमत्कारामागील बूवाबाजी या विषयावर प्रबोधनाचा कार्यक्रम झाला.
देवाडाचे सरपंच कमलाकर येडमे, उपसरपंच अरविंद उपरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबाराव झाडे, माजी अध्यक्ष दौलत देठे, चोराळाचे माजी सरपंच प्रमिला बोरकर, सिदूरचे सरपंच नंदा कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जाधव यांनी जादूटोणाविरोधी कायदा व सापाबद्दलच्या अंधश्रद्धा व गैरसमजुती आणि चमत्कारामागील बुवाबाजी याबद्दलची सविस्तर माहिती सचित्र पोस्टर्स्च्या सहाय्याने समजावून सांगितली. विज्ञान तंत्र व हातचलाखी यावर आधारित दाखविले जाणारे तथाकथित चमत्कार दैवीशक्तीमुळेच होतात, असे भासवून ढोंगी लोक जनतेला कसे फसवितात, याबद्दलची माहिती देऊन तशाच प्रकारे पाण्याने दिवा पेटविणे, खिळ्यांच्या टोकावर उभे राहणे, हवेतून वस्तू काढणे, मंत्राने रिक्त कलशातून तीर्थ काढणे, मांत्रिक पट्टा इत्यादी चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरण केले. यावेळी चमत्कारामागील गैरसमज, बुवाबाजी दूर करण्याकरिता प्रत्येक चमत्कारामागील वैज्ञानिक कारण जाधव यांनी उपस्थितांना स्पष्ट करून सांगितले.
जादूटोणा, भूत, भानामती, करणी, दैवी चमत्कार यांचे जगामध्ये अस्तित्वच नाही. ढोंगी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी समाजामध्ये पेरलेल्या या अफवा आहेत. त्यावर विश्वास न ठेवता संत व समाज सुधारक यांचे अंधश्रद्धा निर्मूलनविषयक विज्ञानवादी विवेकी विचार आत्मसात करून देशहितासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात समितीला सहकार्य करण्याचे आवाहन जाधव यांनी याप्रसंगी केले. सरपंच येडमे यांच्या हस्ते पाण्याने पेटणाऱ्या दिव्याचे प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बचत गटांचे जिल्हा समन्वयक राजेश पिंजरकर यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)