होमगार्डचा वर्धापन दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 01:11 IST2016-12-25T01:11:21+5:302016-12-25T01:11:21+5:30
होमगार्ड व नागरी संरक्षण दलाचा ७० वा वर्धापन दिन जिल्हा प्रशिक्षण केंद्र तुकूम येथे झाला.

होमगार्डचा वर्धापन दिन उत्साहात
मानवंदना : १६१ होमगार्ड सदस्यांचा सहभाग
चंद्रपूर : होमगार्ड व नागरी संरक्षण दलाचा ७० वा वर्धापन दिन जिल्हा प्रशिक्षण केंद्र तुकूम येथे झाला. त्यामध्ये चंद्रपूर पथकातील ७० पुरुष व ३३ महिला होमगार्ड आणि प्राथमिक प्रशिक्षण शिबिरातील ५८ प्रशिक्षणार्थी असे एकूण १६१ होमगार्ड सदस्य सहभागी झाले होते. यानिमित्त परेड कमांडर सा.प्र. सु. शिवशंकर बेमारकर यांनी जिल्हा समादेशकांना सशस्त्र मानवंदना दिली.
याप्रसंगी जिल्हा समादेशक व अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत म्हणाले की, होमगार्डचे जवान हे जनता व पोलिसांमधील दुवा आहेत. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून इमाने इतबारे कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत असतात. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातून २७४ पुरुष होमगार्ड कर्तव्यावर पाठविण्यात आले होते. तसेच होमगार्ड महाराष्ट्र राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा मुंबई येथे झाल्या असून चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्डनी व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच जास्तीत जास्त होमगार्डना कर्तव्य मिळावे या दृष्टीकोनातून माझा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
प्रशिक्षणार्थी महिला होमगार्ड रिना रामटेके व संच यांनी स्वागतगीत सादर केले.
आयोजन पलटन नायक प्रमोद रामेरवार व प्रशासिक अधिकारी गजानन बार्लावार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप बलवीर यांनी आणि आभार प्रदर्शन प्रभारी अधिकारी विजय रामटेके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवराज गुरनुले, रवींद्र मोहितकर, वामन हेडावू, शामराव सोयामकर, गजानन पांडे, संजय कातकर आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
दिलीप गेडाम यांचा सत्कार
मानसेवी प्रशासिक अधिकारी (प्रशिक्षक) दिलीप गेडाम यांनी वयाच्या ५५ वर्षांपर्यंत उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल जिल्हा समादेशक राजपूत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ग्रामरक्षक म्हणून होमगार्डना नियमित कर्तव्य मिळावे, अशी मागणी करण्यात केली.