वनविभागातून रोजगार कल्पना अंमलात आणणार
By Admin | Updated: September 27, 2015 00:52 IST2015-09-27T00:52:42+5:302015-09-27T00:52:42+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा आणि रोजगार यांची योग्य सांगड घालत आपण वनविभागातून रोजगार निर्मीती ही संकल्पना राबविणार आहेत.

वनविभागातून रोजगार कल्पना अंमलात आणणार
सुधीर मुनगंटीवारांचा मानस : रोजगार निर्मितीवर विशेष भर देणार
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा आणि रोजगार यांची योग्य सांगड घालत आपण वनविभागातून रोजगार निर्मीती ही संकल्पना राबविणार आहेत. त्यासाठी बांगलादेशचे नोबेल पुरस्कार प्राप्त प्रो. मोहम्मद युनुस यांच्याशी चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन आपण घेणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे आपणावर ऋण आहे. ते फेडण्यासाठी मंत्री म्हणून आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आपण अनेक निर्णय घेतले असून भविष्यातही घेऊ.
जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या अनेक निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातुन चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर सैनिक शाळेचे निर्माण, चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपुरात वन अकादमीची स्थापना, ताडोबा अभयारण्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा, चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, राजुरा, चिमूर, गडचांदूर, वरोरा, पोंभुर्णा या शहरातील रस्ते विकासासाठी शंभर कोटी रूपयांचे विशेष अर्थसहाय्य, चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिकेचे निर्माण, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, मुल येथे जैवविविधता उद्यानाची निर्मिती असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आपण घेतले असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)