महावितरणद्वारा ऊर्जासंवर्धन आठवडा
By Admin | Updated: December 19, 2015 00:49 IST2015-12-19T00:49:24+5:302015-12-19T00:49:24+5:30
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील विविध कार्यालयात १४ डिसेंबर ते २० डिसेंबरदरम्यान उर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

महावितरणद्वारा ऊर्जासंवर्धन आठवडा
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील विविध कार्यालयात १४ डिसेंबर ते २० डिसेंबरदरम्यान उर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात उर्जा संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
याप्रसंगी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अंकुश नळे यांच्यासोबत चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता हरिष गजबे, विभागाच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार व सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही प्रतिज्ञा केली.
उर्जा संवर्धन कार्यक्रमाचा भाग म्हणून वीज बचतीसाठी एलईडी दिव्यांची विक्री सुरू असून आतापर्यंत महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात २ लाख ५३ हजार एलईडी दिव्यांची विक्री झाली आहे.
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात येणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून विविध ठिकाणी स्टॉल्स लावून या एलईडी दिव्यांची विक्री सुरू केली आहे. या योजनेला ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत या दोन जिल्ह्यात सुमारे १२ हजार ५२२ हजार एलईडी दिव्यांची विक्री झाली आहे. वीज व पैशाची बचत करत गडचिरोली जिल्ह्यातील ग्राहकांनी या योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ही योजना २६ आॅक्टोबरपासूनच सुरू झाली आहे.
चंद्रपूर मंडळातील ३ लाख ११ हजार, गडचिरोली मंडळातील २ लाख ३८ असे चंद्रपूर परिमंडळात एकुण ५ लाख ४९ घरगुती वीज ग्राहक आहेत. या भागात ४२ लाख ५५ हजार एलईडी दिव्यांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे तर राज्यात एकुण ७ कोटी बल्बचे वाटप करावयाचे आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ५८ लाख ४३ हजार एलईडी दिव्यांची विक्री झाली असून विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ४१ हजार एलईडी दिव्यांची विक्री झाली आहे. या एलईडी दिव्यांच्या वापराने वीज बचतीसोबतच पैशाची बचत होण्यास मदत होत आहे. (शहर प्रतिनिधी)