उपेक्षित जीवनाचा अंतही बेवारस...!
By Admin | Updated: February 5, 2015 23:06 IST2015-02-05T23:06:01+5:302015-02-05T23:06:01+5:30
आयुष्याच्या अखेरच्या क्षणी ज्या खांद्यावरून अनंतयात्रेसाठी निघायचे, त्याच खांद्याला चिकटलेले हात बेईमान झालेत. क्षुल्लक कारणावरून घराबाहेर हुसकावून लावल्यानंतर येथील

उपेक्षित जीवनाचा अंतही बेवारस...!
भिक्षुखांचे भयान वास्तव : मृत्यूनंतर पोलीस दफ्तरी ‘अज्ञात’ म्हणून नोद
रुपेश कोकावार - बाबूपेठ (चंद्रपूर)
आयुष्याच्या अखेरच्या क्षणी ज्या खांद्यावरून अनंतयात्रेसाठी निघायचे, त्याच खांद्याला चिकटलेले हात बेईमान झालेत. क्षुल्लक कारणावरून घराबाहेर हुसकावून लावल्यानंतर येथील महाकाली मंदिर परिसरात उपेक्षेचं जीणं जगणाऱ्या वृद्धांच्या नशिबी मरणदेखील बेवारस यावे, ही बाब नियतीलाही एकवार अंतर्मुख करायला लावणारी आहे. गेल्या पाच वर्षांत या परिसरात भिक्षा मागून जगताना मृत्यू आलेल्या जवळपास ४० जणांची नोंद पोलीस दफ्तरी ‘बेवारस’ म्हणून करण्यात आली आहे.
गृहकलहातून घराबाहेर काढून देण्यात आलेल्या अनेकजणांसाठी माता महाकाली मंदिर आधार ठरले. भिक्षा मागत जगतानाच अनेकांना या ठिकाणी मृत्यू आला. त्यांपैकी काहींची ओळख पटली, तर काहीजण आजही ‘अज्ञात’ आहेत. मंदिराच्या कुठल्या कोपऱ्यात निर्जीव देह आढळला की कुणीतरी पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. मग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रेताचा पंचनामा करावा. नातलगांचा काही सुगावा लागतो का ते बघावे. त्यात यश आले नाही तर ढक्कल ठेला आणावा. त्यात तो निर्जीव देह टाकून त्याची स्मशानात विल्हेवाट लावावी, असेच सोपस्कर आजवर पार पडत गेले आहे. ज्या काळजाच्या तुकड्याला जीवापाड जपत अंगा-खांद्यावर खेळवून मोठे केले. भविष्यात तोच काळजाचा तुकडा आपल्याशी बेईमान होईल, असे यांपैकी कुणालाही वाटले नसले. पण दुर्दैवाने ते भोग त्यांच्या नशिबी आले. नातवंडांना मांडीवर खेळवत वृद्धापकाळ घालविण्याचे स्वप्न डोळ्यात रंगविणाऱ्या या भिक्षूकांची स्वप्न मात्र नियतीनं करपून टाकली. घरातून हाकलून दिल्यानंतर भिक्षापात्र हाती घेऊन लाचारीचं जीणं जगणाऱ्यांसाठी ‘माणुसकी’धाऊन येईल काय?