तळोधी, आलेवाही वनजमिनीवर अतिक्रमण
By Admin | Updated: November 5, 2016 02:07 IST2016-11-05T02:07:21+5:302016-11-05T02:07:21+5:30
तळोधी, आलेवाही, आणि मेंढा (उश्राळा) येथील नर्सरीच्या जागेवरच गर्भश्रीमंत लोकांनी अतिक्रमण केले आहे.

तळोधी, आलेवाही वनजमिनीवर अतिक्रमण
वनविभागाचे दुर्लक्ष : अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी
घनश्याम नवघडे/ संजय अगडे नागभीड/ तळोधी (बा.)
तळोधी, आलेवाही, आणि मेंढा (उश्राळा) येथील नर्सरीच्या जागेवरच गर्भश्रीमंत लोकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे पुढे वनविभागाची डोकेदुखी वाढणार असून संघर्षाची स्थितीही निर्माण होण्याची शक्यता आहे.
काही वर्षाअगोदर तळोधी, आलेवाही आणि मेंढा (उश्राळा) येथे वनविभागाने रोपवाटिका तयार केल्या होत्या. या रोपवाटिकांमध्ये बांबू, साग, कडूनिंब, बिव्हला आदी विविध प्रकारच्या झाडांच्या रोपट्यांची या ठिकाणी लागवड करण्यात आली होती. तीन- चार वर्ष या नर्सरीची वनविभागाकडून निगाही राखण्यात आली. ही रोपे चांगली वाढल्यानंतर वनविभागाने या नर्सरीकडे दुर्लक्ष केले. नेमकी हीच संधी साधून काही गर्भश्रीमंत लोकांनी या नर्सऱ्यांवर अतिक्रमण करुन ही संपूर्ण जमीन हडपली आहे. हे अतिक्रमण होत असताना तत्कालीन वन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे सारे घडून आल्याची चर्चा आहे. यामुळे लोकांचे रस्ते व पायवाटीसुद्धा कायमच्या बंद झाल्या आहेत. या अतिक्रमणाने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. परिसरातील गुरांना आता चराईसाठी जागाच उरली नाही. ही यानिमित्ताने निर्माण झालेली प्रमुख समस्या असून जंगली प्राण्यांचा गावाकडे मोठ्या प्रमाणावर ओघ वाढला आहे. ही या निमित्ताने दुसरी मोठी समस्या निर्माण झाली आहे. शिवाय लाखो रुपये किंमतीची वनसंपदाही नष्ट करण्यात आली आहे.
शासन पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी दरवर्षी वनसंपदा जगविण्यासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. यावर्षीसुद्धा दोन कोटी वृक्ष लागवडीचा शासनाने वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच हे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले, असे आता लोक खुलेआम बोलत आहेत.
माहितगार सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वर उल्लेख केलेल्या तिन्ही ठिकाणचे अतिक्रमण पाच-दहा एकरातील नाही तर तब्बल सत्तर ते अंशी हेक्टर क्षेत्रात असल्याचे समजते. उल्लेखनीय बाब अशी की, मागील वर्षी तळोधी येथील काही जागरुक नागरिकांनी तळोधीच्या वनअधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. पण या अधिकाऱ्यांनी याकडे पार दुर्लक्ष केले. वेळीच या अतिक्रमणाला पायबंद घातला असता तर हे अतिक्रमण वाढले नसते असेही यासंदर्भात बोलले जात आहे.
तळोधी येथे नुकत्याच रुजू झालेल्या वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी बोंड येथील अतिक्रमण ज्या प्रकारे हटविले त्याचप्रमाणे हे अतिक्रमण हटवावे अशी मागणी आहे.
या गटामध्ये कोणी कोणी अतिक्रमण केले आहे, याची माहिती गोळा करणे विभागाच्या वतीने सुरु आहे. संपूर्ण माहिती गोळा झाल्यानंतर अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात येईल.
- ई. जी. नेवारे, क्षेत्रसहाय्यक तळोधी.
या अतिक्रमणाने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गुरे चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. जंगली प्राणी गावाकडे येत आहेत. हे अतिक्रमण त्वरित हटविण्याची गरज आहे.
- मनोज वाढई, शिवसेना तालुका उपप्रमुख तळोधी