एक कोटींच्या तहसील क्वॉर्टरवर अतिक्रमण !

By Admin | Updated: December 13, 2015 00:53 IST2015-12-13T00:53:38+5:302015-12-13T00:53:38+5:30

राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शासकीय अधिकारी आपलीच शासकीय संपत्ती वाचविण्यात असमर्थ ठरत आहेत.

Encroachment on one crore tahsil quarter! | एक कोटींच्या तहसील क्वॉर्टरवर अतिक्रमण !

एक कोटींच्या तहसील क्वॉर्टरवर अतिक्रमण !

वसतिगृहासाठी जमीन नाकारली : अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
बी. यू. बोर्डेवार राजुरा
राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शासकीय अधिकारी आपलीच शासकीय संपत्ती वाचविण्यात असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे शासकीय जागेवर तर सोडाच क्वॉर्टरमध्येसुद्धा अतिक्रमण झाल्यामुळे राजुराचे उपविभागीय अधिकाऱ्यांपुढे हे अतिक्रमण हटविणे एक आव्हान ठरले आहे.
ज्या अधिकाऱ्यांच्या काळात सर्वे क्रमांक १४९ मध्ये अतिक्रमण झाले, त्या शासकीय अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे. राजुरा शहरातील इंदिरानगर परिसरातील तहसील कार्यालयाच्या मालकीची जागा व क्वॉर्टरवर अतिक्रमण करण्यात आले आहे.
एक कोटीपेक्षा अधिक किंमत असलेली जागा व क्वॉर्टर ही शासकीय संपत्ती आहे. त्याचेच संरक्षण शासकीय अधिकारी करू शकत नसतील तर सामान्य नागरिकांच्या संपत्तीचे काय रक्षण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजुरा शहरामध्ये मागील २० वर्षांपासून राजुरा तहसील कार्यालयाचे क्वार्टर असुन या ठिकाणी तहसिल कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचारी राहत होते. परंतु कर्मचाऱ्यांनी क्वार्टर सोडून आपआपली घरे बांधली. काही किरायाने राहत आहेत. मात्र याच संधीचा फायदा घेऊन येथील काही लोक शासकीय क्वॉर्टरमध्ये अतिक्रमण करून वास्तव्य करीत आहेत. शहरातील १०० कोटीच्या जमिनीवर धनदांडग्यानी अतिक्रमण केले. परंतु शासकीय यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प बसली आहे. दोन वर्षांपासून शासकीय संपत्तीवर अतिक्रमण झाले असल्याची जाणिव उपविभागीय अधिकाऱ्यांना आहे. परंतु अतिक्रमणधारकांवर कोणतीच कारवाई होत नाही. या उलट गरीबांच्या झोपड्या पाडण्यात मात्र येथील अधिकारी मोठी तत्परता दाखवित आहे.
राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मधील वैभवशाली तलावातदेखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. येथील काही नगरसेवकांनी आपल्या मतांच्या राजकारणासाठी या नागरिकांना आश्रय दिला. त्यामुळे शासकीय संपत्ती या अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केली. तलावाच्या जुना नकाशाचे अवलोकन केल्यास केवढा मोठा अतिक्रमण आहे, हे लक्षात येईल. पैशासाठी वाट्टेल युक्त्या लढवायला येथील माफीया तयार असुन यामध्ये काही शासकीय अधिकारीसुद्धा गुंतलेले आहेत. येथील काही माफिया पैशाने आम्ही अधिकारी विकत घेतो, या गुर्मीत असून यांची गुर्मी उतरविणारा अधिकारी अजूनपर्यंत राजुऱ्यात आलेला नाही.

Web Title: Encroachment on one crore tahsil quarter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.