चारगाव धरणाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनीवर अतिक्रमण
By Admin | Updated: November 19, 2015 01:02 IST2015-11-19T01:02:59+5:302015-11-19T01:02:59+5:30
तालुक्यातील चारगाव धरणातील बुडीत क्षेत्रातील गाळपेर जमिनीवर अतिक्रमण करण्यात येवू नये असे आदेश पाटबंधारे विभागाने दिल्यानंतरही

चारगाव धरणाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनीवर अतिक्रमण
पीक घेणे सुरू : प्रकल्पग्रस्त मात्र वंचित
वरोरा : तालुक्यातील चारगाव धरणातील बुडीत क्षेत्रातील गाळपेर जमिनीवर अतिक्रमण करण्यात येवू नये असे आदेश पाटबंधारे विभागाने दिल्यानंतरही अनेकांनी या क्षेत्रात आंतर मशागत करून बेकायदेशीर वहीवाट केली आहे. त्यामुळे ज्यांची प्रकल्पात जमिनी गेल्या ते या जमिनीच्या वहिवाटीपासून वंचीत झाले आहे.
वरोरा तालुक्यातील बोरगाव उमरी, साखरा (रा), पार्डी (जामणी), गिरोला, सावरी बिडकर, राळेगाव, चारगाव (बु) आदी गावातील जमिनी १९७६ मध्ये चारगाव धरणाच्या बुडीत क्षेत्राकरीता संपादित करण्यात आली आहे. सध्या धरणातील पाणी कमी झाल्यामुळे जमीन गाळफेळ जमीन म्हणून वहिवाट करणे शक्य झाले आहे. राज्य शासनाच्या १९८२ च्या निर्णयानुसार बुडीत क्षेत्रातील जमिनी ज्यांच्या होत्या, त्यांना वहिवाटी करण्याकरीता देण्यात याव्यात असे निर्देश आहेत. परंतु या जमिनी प्रकल्पग्रस्तांना देण्यात आल्या नाही.
या जमिनीवर गैर प्रकल्पग्रस्त मागील कित्येक वर्षापासून मशागत करीत वहीवाट करून लाखो रुपयाचे उत्पादन घेत आहे. पिकाला पाणीही चारगाव धरणातून विना परवानगीने घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त स्वत:च्या जमिनीतून पीक घेण्यापासून वंचीत झाले असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)