उर्दू प्राथमिक शाळेला अतिक्रमणाचा विळखा

By Admin | Updated: August 12, 2016 01:14 IST2016-08-12T01:14:26+5:302016-08-12T01:14:26+5:30

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक जाती धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी वरोरा शहरात नगर परिषदतर्फे प्राथमिक शाळा सुरू आहेत.

Encroachment of encroachment in Urdu primary school | उर्दू प्राथमिक शाळेला अतिक्रमणाचा विळखा

उर्दू प्राथमिक शाळेला अतिक्रमणाचा विळखा

वरोरा नगरपालिकेचे दुर्लक्ष : विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो त्रास
वरोरा : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक जाती धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी वरोरा शहरात नगर परिषदतर्फे प्राथमिक शाळा सुरू आहेत. मात्र त्यातील उर्दू प्राथमिक शाळा ही नगरसेवकांच्या व पदाधिकारांच्या दुर्लक्षतेमुळे अनेकांना ही आपलीच मालमत्ता असल्याचे वाटायला लागले आहे. या शाळेसमोर काहींनी अतिक्रमण करून जागा बळकावली आहे. मात्र याकडे नगरपरिषद बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, स्वछता विभाग व पोलीस प्रशासनही लक्ष द्यायला तयार नाही.
काही नगरसेवकांनी अतिक्रमणाबाबत सभेत विषय मांडला तरी त्या विषयावर चर्चा होत नाही. आपला पाल्य हा शिकला पाहिजे, मोठा अधिकारी किंवा मोठा व्यावसायिक झाला पाहिजे, हे प्रत्येक पालकाला वाटत असते. पण आर्थिक परिस्थीती आणि महागाईमुळे काही पालक आपल्या पाल्यांना नगरपरिषदेच्या शाळेमध्ये पाठवतात. हातावर आणून पानावर खाण्याची परिस्थिती असणारे बहुसंख्य गरीबांचे मुले कधी अनवाणी पायाने तर कधी फाटलेले कपडे घालून का होईना, दररोज शाळेत हजेरी लावतात.
ज्या शाळेत मुले शिक्षण घेतात त्या शाळेत जायला रास्ता नाही, पटांगण आहे पण पाऊस आला तर पटांगणाला स्विमिंग पुलाचे स्वरूप येते. शहरात नगरपरिषदेच्या नाकर्तेपणामुळे मोडकळीस आलेल्या अनेक शाळा आहेत. पण शहरातील मुख्य चौकातील म्हणजे नेहरू चौकातील उर्दू प्राथमिक शाळा हे चांगलेच उदाहरण आहे.
अनेक मुस्लिम बांधवांचे पाल्य या शाळेत विद्याग्रहण करायला येतात. परंतु, शाळेच्या सुरक्षा भिंतीच्या काही अंतरावरच दुकाने असावे असा नियम असताना शाळेलाच लागूनच काही अवैद्य दारू विक्रेते दारू विक्रीचा व्यवसाय करतात. सट्टापट्टी घेणाऱ्यांची व लावणाऱ्यांची गर्दी या परिसरात नेहमीच असते. अतिक्रमणमुळे विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शाळेसमोर असणारे चिखल, कचरा, पाणी साचलेले आहे. एकीकडे स्वच्छतेच्या नावावर दुसरा क्रमांक पटकविणारी नगरपरिषद आणि दुसरीकडे स्वच्छतेच्या नावावर लखपती बनलेले ठेकेदार यांना शाळेसमोरचे चित्र दिसत नसावे. त्यामुळे परिसरात स्वच्छतेचे बारा वाजल्यासाचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शाळेसमोर हा सर्व प्रकार सुरु असताना वरोऱ्यातील राजकीय पक्ष गप्प का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे .त्यामुळे या समस्येकडे लक्ष देऊन परिसरात स्वछता आणि बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत . (शहर प्रतिनिधी)

Web Title: Encroachment of encroachment in Urdu primary school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.