सर्वोतम आरोग्य सुविधांसाठी यंत्रणा सक्षम करणार
By Admin | Updated: September 4, 2016 00:47 IST2016-09-04T00:47:00+5:302016-09-04T00:47:00+5:30
जनतेला सर्वोतम आरोग्य सुविधा पुरविण्यासोबतच आरोग्य केंद्रामध्ये रोगनिदान व उपचारासाठी आवश्यक सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात येऊन ...

सर्वोतम आरोग्य सुविधांसाठी यंत्रणा सक्षम करणार
सुधीर मुनगंटीवार : सर्वच आरोग्य केंद्रांत सूचना व तक्रार पेटी
चंद्रपूर : जनतेला सर्वोतम आरोग्य सुविधा पुरविण्यासोबतच आरोग्य केंद्रामध्ये रोगनिदान व उपचारासाठी आवश्यक सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात येऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वित्तमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची सभा ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी एम देवेंदर सिंग, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जयस्वाल, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम.मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार व समितीचे नवनियुक्त सदस्य उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या माध्यमातून जनतेला प्रभावी व किफायतशीर आरोग्य सेवा पुरविण्यात येतील. शासकीय तसेच खाजगी आरोग्य सेवासंस्था यांच्या समन्वयाने जनतेला दर्जेदार व प्रभावी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कॅन्सरसह सर्व आजाराच्या निदान व उपचारासाठी जिल्हयात सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी समन्वय समितीच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करण्यात येतील. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधांचा लाभ देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दोन दिवसांचे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी पायाभुत सुविधांसह रिक्त पदे भरण्याला प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे समाधान करण्यासोबतच स्वच्छता व आवश्यक सोईसुविधांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सेवा देण्यासंदर्भातील मानसिकतेत बदल तसेच उत्तम काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे आदी सुधारणा करण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
औषधोपचारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रत्येक दवाखान्यात तक्रार व सुचना निवारण पेटी ठेवण्यात येऊन त्या संदर्भात आवश्यक सूचनांची नियमितपणे दखल घेण्यात यावी. औषधांची उपलब्धता तसेच अद्यायावत रुग्णवाहिका, आरोग्य विभागाची स्वत:ची संगणक प्रणाली, अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, आयसीयू कक्षामध्ये वाढ, एमआरआय मशिनद्वारे नियमित उपचार आदी सुधारणा करण्यासंदर्भात आरोग्य सेवा समन्वय समितीने पुढाकार घेऊन येत्या १० दिवसात अहवाल सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार नाना श्यामकुळे, आरोग्य सेवा समन्वय समितीचे सदस्य डॉ.गोपाल मुंदडा, डॉ.मंगेश गुलवाडे, डॉ.अजय दुद्दलवार आदींनी आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी सूचना केल्या.
पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासा
ग्रामीण भागात दुषित पाण्यामुळे साथीच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करुन पिण्याअयोग्य असलेल्या गावांमध्ये ठळकपणे माहिती फलक लावण्यात यावे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या शुध्दीकरणासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ सुरु कराव्यात, अशा सूचनाही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिल्या.
सामाजिक दायित्व निधीसाठी प्रयत्न
आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी विविध उद्योजकांकडे असलेला सामाजिक दायित्व निधी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक व सेवाभावी संस्थांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये पाणी शुध्दीकरण यंत्र बसविण्यासंदर्भातही ना. मुनगंटीवार यांनी सूचना दिल्या.
महिलांसाठी लोहयुक्त औषधी
महिला व किशोरी मुलीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आरोग्य तपासणीमध्ये आढळले असून हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या लोहयुक्त औषधी तसेच नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य परिचारिकांवर जबाबदारी सोपविण्यासंदर्भात बैठकीत सुचना करण्यात आल्या असून सिकलसेल आजाराबाबतही विशेष आरोग्य अभियान आयोजित करुन औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.