एम्टा कोळसा कामगारांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
By Admin | Updated: September 7, 2016 00:53 IST2016-09-07T00:53:09+5:302016-09-07T00:53:09+5:30
कर्नाटक एम्टा कोळसा खाणीतील कामगारांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही...

एम्टा कोळसा कामगारांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
एस.क्यू. जमा : १६ महिन्यांपासून वेतन नाही
भद्रावती : कर्नाटक एम्टा कोळसा खाणीतील कामगारांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही इंटकचे कोळसा कामगार नेते एस.क्यू. जमा यांनी येथील डॉ.आंबेडकर चौकातील प्रांगणात उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्ता मिळविली. हेच ते काय अच्छे दिन अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला. आज एम्टा या खाणीतील कामगार खाण बंद असल्याने गेल्या १६ महिन्यांपासून विनावेतन आहेत. त्यांची स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. कोळसामंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. हंसराज अहीर यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार आणि चर्चा करूनसुद्धा हा प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे आम्हाला न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले. हा लढा आता न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी भद्रावती शहर काँग्रेसचे अहवाल दिलीप ठेंगे, राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ (इंटक) वेकोलि माजरी क्षेत्राचे महासचिव धनंजय गुंडावार, स्थानिक कामगार नेते विशाल दुधे यांनीही आपले विचार व्यक्त केले. व्यासपिठावर जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष के.के. सिंह, प्रकाश दास, लक्ष्मण सादलवार, सुदर्शन डोये, चंदना यादव, रामपाल वर्मा उपस्थित होते.
सुरुवातीला एस.क्यू. जमा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. धरणा सभेच्या दरम्यान कामगारांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी असंख्य कामगार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आलेल्या मोर्च्याचे धरण्यात रूपांतर झाले. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदन देण्यात आले. आपल्या मागण्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून सहा महिण्याचा पगार कंपनी कामगारांना देणार आहे. त्यात पहिल्यांदा तीन महिने आणि नंतर तीन महिने असा पगार होईल. कर्नाटक एम्टा आणि महाराष्ट्र शासन यांच्यात याबाबत चर्चा झाली आहे. परंतू त्यावर स्वाक्षरी होणे बाकी आहे. आपल्या भावना त्यांना कळवू, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. शिष्टमंडळात कोळसा कामगार नेते एस.क्यू.जमा, धनंजय गुंडावार, के.के. सिंग आणि इतर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)