वेकोलि प्रकल्पग्रस्तांना शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार रोजगार
By Admin | Updated: March 21, 2017 00:39 IST2017-03-21T00:39:58+5:302017-03-21T00:39:58+5:30
वेकोलिमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सतत प्रयत्न व संघर्ष केल्यानंतर हा गुंतागुंतीचा व बऱ्याच अवधीपासून लोंबकळणारा ...

वेकोलि प्रकल्पग्रस्तांना शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार रोजगार
हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना यश : प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंद
चंद्रपूर : वेकोलिमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सतत प्रयत्न व संघर्ष केल्यानंतर हा गुंतागुंतीचा व बऱ्याच अवधीपासून लोंबकळणारा प्रश्नही ना. अहीर यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याने नव्याने प्रकल्पग्रस्त म्हणून वेकोलिमध्ये रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिक्षणाचा सन्मान ठेवत त्यांच्या पात्रतेनुसारच नोकरी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.त्यामुळे वेकोलि प्रकल्पग्रस्तांनी ना. अहीर यांचे अभिनंदन करून आभार मानले आहे.
यापूर्वी वेकोलि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीला वाढीव मोबदला, प्रकल्पग्रस्तांना विसंगती असलेल्या नियमात बदल करून न्यायोचित मार्गाने नोकऱ्या मिळवून देण्यात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांना यश आले होते. त्यानंतर आता कोल इंडिया लिमीची सब्सीडी वेकोलि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आजतागायत काम देण्यात येत नव्हते. बहुतांशी नव्याने नियुक्त होणाऱ्या वेकोलि प्रकल्पग्रस्तास जनरल मजदूर कॅटेगरी-१ या पदावरच समावून घेतले जात होते. सदर प्रकार अन्यायी असल्याने ना. हंसराज अहीर यांनी ही बाब कोळसा मंत्रालय कोल इंडिया तसेच वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शैक्षणिक अर्हतेनुसारच संबंधित प्रकल्पग्रस्तांना वेकोलि प्रबंधनात तत्सम पदावर सामावून घेण्यात यावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेक बैठकांच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न उपस्थित करून संबंधिताने लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्या या भूमिकेवर शिक्कामोर्तब करून वेकोलिच्या फंक्शनल डायरेक्टरांच्या ६९४ व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यास कोल इंडिया व वेकोलिला बाध्य केले. त्यामुळे या निर्णयामुळे वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या शिक्षणाचा सन्मान होवून त्यांच्या पात्रतेनुसारच आता नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.
तांत्रिक शिक्षण, आयटीआय, डिप्लोमाधारक, अभियांत्रिकी यासारख्या पदवीधारकांना तसेच बी.ए. व तत्सम पदवीधारकांना त्याचबरोबर दहावी इयत्ता पास व यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असलेल्या व ३५ वर्ष पेक्षा कमी वयोमर्यादा असणाऱ्यांची सुरक्षाकर्मी म्हणून प्रकल्पग्रस्तांची वेकोलिमध्ये नियुक्ती होणार असून ही निवड ऐच्छिक स्वरूपाची ठेवण्यात आली आहे. हा निर्णय हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून घेतल्या गेल्याने वणीचे आ. संजय रेड्डी बोदकुरवार, राजुऱ्याचे आमदार अॅड. संजय धोटे, चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, पूर्व पालकमंत्री संजय देवतळे, विजय राऊत, व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आभार मानले. (नगर प्रतिनिधी)