कर्नाटका एम्टामधील कामगारांची आर्थिक कोंडी

By Admin | Updated: August 21, 2015 01:40 IST2015-08-21T01:40:43+5:302015-08-21T01:40:43+5:30

गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीतील कार्यरत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आल्याने मिळेल ते काम करण्याचे संकट त्यांच्यावर ओढवले आहे.

Employers' economic stakes in Karnataka Emata | कर्नाटका एम्टामधील कामगारांची आर्थिक कोंडी

कर्नाटका एम्टामधील कामगारांची आर्थिक कोंडी

भद्रावती : गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीतील कार्यरत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आल्याने मिळेल ते काम करण्याचे संकट त्यांच्यावर ओढवले आहे.
यातील कामगार मोल मजुरीसह मच्छी, भुट्टा, मुंगफल्ली, फळे, भंगार, भाजीपाला अशा प्रकारची कामे करुन कोळसा खाण सुरु होईल या आशेवर एक- एक दिवस पुढे रेटत आहे. खाणीत पीसी आॅपरेटर या पदावर काम करुन २० ते २५ हजार कमविणारा आज भुट्टे विकून तीन ते चार हजार कमवत आहे. बरांज मोकासा येथे असलेल्या या कोळसा खाणीत जवळपास ८०० कामगार कार्यरत होते. यात बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेशन, पश्चिम बंगाल या बाहेरील राज्यासह उर्वरित महाराष्ट्र राज्यातील कामगार कार्यरत होते. या खाणीत पीसी आॅपरेटर, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशीएन फिटर, वेल्डर, सुरक्षा कर्मचारी, वायरमन, हेल्पर, लेबर या पदावर हे कामगार काम करीत होते. प्रती दिवशी आठ तास कामाच्या मोबदल्यात महिन्याला त्यांना २० ते २५ हजार रुपये पगार मिळत होता. कंपनीने त्यांना राहण्याकरिता खाणी शेजारीच वसाहत बांधली. त्यात वीज, पाणी आणि इतर मुलभूत सुविधासुद्धा पुरविल्या होत्या. त्यांच्या मुलांना परिसरातील शाळा, कॉलेजमध्ये जाण्या- येण्याकरिता स्कूलबसची व्यवस्था, कामगारांना ने- आण करण्याकरिता स्टार बसची व्यवस्था, कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांच्या उपचाराची जबाबदारीदेखील कंपनीने घेतली होती. परंतु कंपनी बंद झाल्यानंतर देण्यात येणाऱ्या संपूर्ण सुविधा काढून घेण्यात आल्या. ‘ नो वर्क- नो पे’ या नियमानुसार कामगारांना आर्थिक मोबदला दिला जात नाही. त्यामुळे याठिकाणी कार्यरत काही बाहेरील कर्मचारी कंपनी सुरु होईल, या आशेवर येथेच राहात असून उदरनिर्वाहासाठी ते मिळेल ते काम करीत आहे. काही कामगारांनी स्वत:चा छोटेखानी चालता फिरता व्यवसाय सुरु केला आहे. तरीही ते आर्थिक कोंडीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Employers' economic stakes in Karnataka Emata