कर्मचाऱ्यांनी घेतला धसका
By Admin | Updated: August 4, 2014 23:39 IST2014-08-04T23:39:44+5:302014-08-04T23:39:44+5:30
मागील काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या काही शासकीय कार्यालयातील कारभार ढेपाळला आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. ढेपाळलेला कारभार सुरळीत

कर्मचाऱ्यांनी घेतला धसका
जिल्हा परिषद : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची अचानक भेट
चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या काही शासकीय कार्यालयातील कारभार ढेपाळला आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. ढेपाळलेला कारभार सुरळीत करण्यासाठी मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी आता पाऊल उचलले आहे. शासकीय कार्यालयांना अचानक भेट देवून कामचुकार कर्मचाऱ्यांना वटणीवर आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहे.
मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेतून ग्रामीण भागासाठी अनेक विकासात्मक कामे केल्या जाते. मात्र काही अधिकारी, कर्मचारी सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे धोरण अवलंबित आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्या यासाठी कर्मचाऱ्यांना समजदारीचे धडे देण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र काही कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसताच त्यांनी आता थेट शासकीय कार्यालय, शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत आदी कार्यालयाना अचानक भेट देवून पाहणी सुरु केली आहे. त्याचसोबतच नागरिकांकडून समस्या ऐकून घेत आहे. त्यामुळे आता जे कर्मचारी कामचुकारपणा करीत आहे त्यांची चांगलीच गोची झाली आहे.
विशेष म्हणजे, जे कर्मचारी मुख्यालयी न राहता घरभाडे उचलत आहे. त्यांच्यावरही आता कुऱ्हाड येणार आहे.१ आॅगस्ट रोजी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी नकोडा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी प्रथम आरोग्य केंद्राला भेट दिली.
या भेटीत त्यांना आरोग्य सेविका गैरहजर असल्याचे दिसले. त्याचसोबत यावेळी एक रुग्ण महिला उपचारासाठी आली. हा प्रकार दिसताच मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी लागलीच आरोग्यसेविकेला निलंबित केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.
या भेटीत शाळेला सुटी नसतानाही शाळेला कुलूप लावून असलेले दिसते. त्यामुळे त्यांनी मुख्याध्यापकालाही निलंबित केले. एवढेच नाहीतर त्यांनी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वच्छते संबंधात चांगलेच खडसावले. ही बातमी वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली आणि कामचुकार कर्मचाऱ्यांची धडकी भरली. त्याचा परिणाम जिल्हातील काही शासकीय कार्यालयात जाणवू लागला. (नगर प्रतिनिधी)