आरोग्य केंद्रात आपातकालीन सेवा नावापुरतीच
By Admin | Updated: February 5, 2016 00:48 IST2016-02-05T00:48:19+5:302016-02-05T00:48:19+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना त्याच्या गावाजवळच आरोग्य सेवा मिळावी, तसेच उपचाराअभावी गरिबांना ....

आरोग्य केंद्रात आपातकालीन सेवा नावापुरतीच
खडसंगी आरोग्य केंद्र : अपघातातील जखमीवर अर्धातासानंतर उपचार
खडसंगी : ग्रामीण भागातील नागरिकांना त्याच्या गावाजवळच आरोग्य सेवा मिळावी, तसेच उपचाराअभावी गरिबांना आपल्या जिवाला मुकावे लागू नये म्हणून शासनाने गावाची लोकसंख्या बघून प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली. मात्र खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक महिन्यापासून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्था ढेपाळली आहे. याचा प्रत्यय रविवारी आला.
रविवारी एका अपघातात जखमी युवकावर उपचारासाठी अर्धा तास प्रतीक्षा करावी लागल्याने येथील नागरिकांना आरोग्य विभागाची इमर्जन्सी सेवा कशी तत्पर आहे याचा प्रत्यय आला. त्यामुळे खडसंगी आरोग्य केंद्राची अत्यावश्यक सेवा नावालाच असल्याचे दिसून आले.
चिमूर तालुक्यातील चिमूर- वरोरा मुख्य मार्गावर वसलेल्या खडसंगी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रात ३० ते ४० गावांचे नागरिक उपचारासाठी येतात. तर मुख्य मार्ग असल्याने वेळीअवेळी अपघातग्रस्त रुग्ण येतात. आरोग्य केंद्रात मागील काही महिन्यापासून येथील कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने बाह्य रुग्ण सेवा एक- एक तास उशिरा सुरु होते. त्यामुळे रुग्णांना डॉक्टर व कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते.
यामुळे अनेक मजुरवर्गातील रुग्णांना काही प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागते. येथील काही कर्मचाऱ्यांच्या उर्मटपणाच्या अनेक रुग्णांनी तक्रारी केल्या. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
रविवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान बसस्थानक परिसरात दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या जखमी युवकाला काही गावातील तरुणांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून साधा चौकीदारही हजर नसल्याने रुग्णाला अर्धा तास तसेच ठेवावे लागले. काही युवकांनी वैद्यकीय अधिकारी तथा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला, तेव्हा कुठे एका परिचारिकांनी येऊन त्या रुग्णावर उपचार केलेत. मात्र या जखमी युवकाला उपचारासाठी चक्क अर्धातास विव्हळत राहावे लागले. अर्ध्या तासानंतर आलेल्या परिचारिकेने उपचार सुरु करताच नागरिकावर प्रश्नांची सरब्बती करीत समाजसेवा करायची तर पूर्ण करा, असे उलटसुलट प्रश्न केले.
त्यामुळे अनेक नागरिकांनी या प्रकाराबाबत आरोग्य विभागाविषयी संताप व्यक्त केला आहे. नागरिकासोबत उर्मट वागणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)