ग्रामसेवकांचा प्रशासनाविरुद्ध एल्गार
By Admin | Updated: November 2, 2016 00:53 IST2016-11-02T00:53:18+5:302016-11-02T00:53:18+5:30
मागील सहा महिन्यांपासून ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत.या मागण्याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत ...

ग्रामसेवकांचा प्रशासनाविरुद्ध एल्गार
मासिक, त्रैमासिक बैठकीवर बहिष्कार : आजपासून असहकार आंदोलन
चंद्रपूर : मागील सहा महिन्यांपासून ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत.या मागण्याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत चंद्रपूर जिल्हा ग्रामसेवक युनियनने २ नोव्हेंबरपासून जिल्हाभरातील पंचायत समितीसमोर असहकार आंदोलन पुकारले आहे.
ग्रामसेवकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील अनेक महिन्यापासून ग्रामसेवक युनियनद्वारे पत्रव्यवहार सुरू होता. मात्र दखलच घेतली जात नाही, असा आरोप आहे. शासनाचा दूत या नात्याने ग्रामीण भागात विकासाचे कार्य करुनही प्रशासनाकडून असमानतेची वागणूक मिळत आहे, ग्रामसेवक प्रशासन व राजकीय पुढाऱ्याच्या मधे भरडला जात आहे. यातून ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्याचाही संघटनेचा आरोप आहे.
वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार आणि वाटाघाटी करुनही समस्या कायम आहेत. त्यामुळे ग्रामसेवक युनियनने प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारीत असहकार आंदोलन करणार असल्याचे यापूर्वीच मुख्य कार्यपालन अधिकारी व ग्रामविकास मंत्रालयाला कळविले होते.
निवेदनामध्ये मांडलेल्या समस्यापैकी सन २००९ पासून ग्रामसेवक संवर्गाला सेवेत कायम न करणे, कंत्राटी ग्रामसेवकाची अनामत रक्कम परत न करणे, डीसीपीएसची कपात केलेल्या रकमेच्या पावत्या न मिळणे, महात्मा गांधी, मग्रारोयोची कामे केवळ ग्रामसेवकावर थोपविणे, ग्रामसेवकाने केलेल्या कामावर नजरचुकीने अनियमितता झाल्यास ग्रामसेवकावर कारवाई करणे, वैयक्तिक शौचालयाच्या बांधकांमाची ग्रामसेवकावर सक्ती न करणे, कालबद्ध पदोन्नती प्रथम, द्वितीय लागू न करणे, ग्रामसेवकाचे सेवापुस्तके अद्यावत करणे, चिमूर पंचायत समितीत ग्रामसेवकाचे असहकार आंदोलन सुरु आहे. त्यावर कुठलीही कारवाई न करणे, प्रत्येक तालुक्यात ई टेंडरीगची सुविधा करणे, चिमूर पंचायत समितीच्या ग्रामसेवकांचे (एमआरईजीएस) पूर्व सूचना व लेखी कारण न मागविता त्यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम परत करावी, या विविध मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.
ग्रामसेवक युनियनने दिलेल्या निवेदनात आंदोलनादरम्यान ग्रामसेवक शासनाच्या मासिक, त्रैमासिक बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मात्र ग्रामपंचायतीमध्ये राहून जनतेची कामे करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. ग्रामसेवकाच्या जिल्ह्यातील या असहकार आंदोलनामुळे प्रशासनाच्या योजना व माहिती जनतेपर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होऊन प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आंदोलनाचे टप्पे
जिल्हाभरातील ग्रामसेवक कोणत्याही मासिक, पाक्षिक, पं.स. व जि.प. स्तरावरील इतर कोणत्याही आढावा सभेला बसणार नाहीत. जन्म, मृत्यू, पाणी टंचाई व निवडणूक ही कामे वगळता अहवाल सादर करणार नाहीत. ग्रामपंचायतीचे दप्तर तपासनीस वरिष्ठ अधिकाऱ्यास रेकार्ड उपलब्ध करुन देणार नाहीत.
या असहकार आंदोलनात जिल्ह्यातील ७३५ (अंदाजे) ग्रामसेवक सहभागी आहेत. प्रशासनाला या मागण्याचे अनेकदा निवेदन दिले आहेत. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. आंदोलनादरम्यान जनतेची कामे करण्यात येणार असून प्रशासनास अहवाल देणार नाही. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
- पद्माकर अल्लीवार, जिल्हा सरचिटणीस,
ग्रामसेवक युनियन जिल्हा चंद्रपूर