काजळसरच्या शेतकऱ्याने शोधले मोहक बासमती वाण
By Admin | Updated: June 25, 2015 01:21 IST2015-06-25T01:21:05+5:302015-06-25T01:21:05+5:30
येथून ६ कि.मी. वर असलेल्या काजळसर (त. चिमूर) येथील शेतकरी हरिदास श्रावण दुधनकर यांनी ....

काजळसरच्या शेतकऱ्याने शोधले मोहक बासमती वाण
पेंढरी (कोकेवाडा) : येथून ६ कि.मी. वर असलेल्या काजळसर (त. चिमूर) येथील शेतकरी हरिदास श्रावण दुधनकर यांनी आपल्या कल्पक वृत्तीतून मोहक बासमती सुगंधित धानाचे वाण शोधून काढले. त्यांचे हे कार्य इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
सदर धानाचा शोध हा सन २००९ मध्ये क्रांती धानातून दोन-दोन लोंब काढून करण्यात आला होता. त्यानंतर सन २०१४ ला जास्त उत्पादन काढले. एका लोंबात अंदाजे ३८० दाणे आहेत. दुधनकर यांनी दोन एकरात मागील वर्षी ४५ क्विंटलच्या वर उत्पन्न म्हणजेच एकरी साडेबावीस क्विंटल उत्पन्न घेतले. त्या सर्व धानाचे त्यांनी साडेबावीस क्विंटल तांदूळ बनवून नागपूरला घरगुती नऊ हजार रुपये तर चंद्रपूरच्या कृषी प्रदर्शनात सहा हजार रुपये क्विंटल भावाप्रमाणे विकले. तसेच या धानाच्या कणीचे (बारिक तांदळाचे) अठरा हजार असे त्यांना एकुण उत्पन्न एक लाख ७ हजार १०० रुपये झाले असून धान लागवडीपासून ते तांदुळ विकण्यापर्यंतचा एकुण खर्च अंदाजे ४० हजार रुपये इतका आला. या संशोधक वृत्तीसाठी त्यांना चिमूरचे तालुका कृषी अधिकारी एम.पी. पवार, नेरीचे मंडळ कृषी अधिकारी आर.के. सोलव हे मार्गदर्शन करीत आहेत. या कार्यात त्यांची सहचारिणी ललिता दुधनकर, मुलगा मनोज व सून शितल दुधनकर सहकार्य करीत आहेत. या प्रयोगामुळे ते इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. (वार्ताहर)