चिमुरातील विद्युत पुरवठा होणार आता भूमिगत

By Admin | Updated: August 27, 2016 00:33 IST2016-08-27T00:33:51+5:302016-08-27T00:33:51+5:30

नुकतेच ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रात परिवर्तीत झालेल्या चिमूर शहरातील मुख्य वस्तीतील घरे दाट आहेत. त्यामुळे रस्तेही अरुंद बनले, ...

The electricity supply will now be underground | चिमुरातील विद्युत पुरवठा होणार आता भूमिगत

चिमुरातील विद्युत पुरवठा होणार आता भूमिगत

भांगडियांचे प्रयत्न : ऊर्जामंत्र्यांकडून २४ कोटी मंजूर 
चिमूर : नुकतेच ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रात परिवर्तीत झालेल्या चिमूर शहरातील मुख्य वस्तीतील घरे दाट आहेत. त्यामुळे रस्तेही अरुंद बनले, त्यातच विद्युत विभागाच्या विद्युत वाहिनीच्या तारा यामुळे अनेकवेळा दुर्घटना झाल्या आहेत. या दुर्घटना टाळण्यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी ऊर्जा मंत्रालयात पत्रव्यवहार करुन २३ कोटी ९८ लाख रुपये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडून मंजूर करुन घेतले आहेत. त्यामुळे चिमूर शहरातील विद्युत वाहिनी आता भूमिगत होणार आहेत.
मागील वर्षी नगरपरिषद झालेल्या चिमूर शहराचा विकास करण्याकरिता आमदार किर्तीकुमार भांगडिया कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्था, नाल्या, रस्ते व्हावे, याकरिताही अनेक विभागाकडून निधी आणला जात आहे. मात्र शहरातील दाटलेली घरे, अरुंद रस्ते व त्यातच विद्युत खांबावरील तारा लोंबकळत असतात. या तारामुळे अनेकदा अपघात होत असतात. यामुळे जीवहानीसह आर्थिक हानी होत असते. ही हानी टाळण्यासाठी व गावातील रस्ते रुंद करण्याच्या दृष्टीने या तारा भूमिगत करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात आली तरी यासाठी एवढा निधी कुठून आणायचा, हा प्रश्न होताच.
महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांच्या ११ जून २०१६ च्या पत्रानुसार अंदाजपत्रक बनवून मुख्य अभियंता (डीस्ट) महावितरण कंपनी मुंबई यांच्याकडे सादर केले. या प्रस्तावित भूमिगत विद्युत वाहिनीच्या खर्चाला विशेष बाब म्हणून ऊर्जामंत्री बावणकुळे यांनी मंजुरी दिली असून येत्या काही महिन्यात भूमिगत विद्युत जोडणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
या भूमिगत विद्युत वाहिनीमुळे रस्त्यावरील वीज खांब व तारा हटून रस्ता मोकळा होणार आहे. रुंद रस्ते पहायला मिळणार आहे. या भूमिगत विद्युत जोडणीमुळे चिमूरकरांना करावा लागणारा त्रास दूर होऊन सर्वसामान्याचे होणारे आर्थिक नुकसानही वाचणार आहे. (प्रतिनिधी)

रात घोड्याचा मार्ग होणार सुखर
चिमूर तालुक्यातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या बालाजी महाराजांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये विदर्भातील भाविक मोठ्या संख्येने येतात. घोडा यात्रेमध्ये रात घोडा काढण्यात येतो. या रातघोड्यामध्ये लाकडी रथावर आरुढ झालेल्या बालाजी महाराजांची रथावरुन मिरवणूक काढण्यात येते. गावातील रस्ते उंच झाल्याने रथ गावातून फिरताना विद्युत तारा लागत होत्या. त्या अनुषंगाने विद्युत कंपनीचीही चांगलीच तारांबळ उडत होती. मात्र आता होणाऱ्या भूमिगत विद्युत जोडणीमुळे चिमुरातील प्रसिद्ध रात घोड्याचा मार्ग सुखर होणार आहे.

Web Title: The electricity supply will now be underground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.