विद्युत व पाणी पुरवठ्यातही भ्रष्टाचार

By Admin | Updated: September 13, 2015 00:57 IST2015-09-13T00:57:13+5:302015-09-13T00:57:13+5:30

येथील नगर परिषदेने मंजूर केलेले लीज प्रकरण चर्चेचा विषय ठरले असतानाच स्वच्छता, पाणीपुरवठा...

Electricity and water supply corruption | विद्युत व पाणी पुरवठ्यातही भ्रष्टाचार

विद्युत व पाणी पुरवठ्यातही भ्रष्टाचार

नगरसेवकांचा आरोप : समितीमार्फत चौकशीची मागणी
वरोरा : येथील नगर परिषदेने मंजूर केलेले लीज प्रकरण चर्चेचा विषय ठरले असतानाच स्वच्छता, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागांच्या कामांमध्येही कमालीची अनियमितता असून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सत्तापक्षातील काही नगरसेवकांसह विरोधी गटाच्या नगरसेवकांनी १० सप्टेंबर रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत केला. यामुळे नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कामाची चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.
वरोरा येथील नगर परिषदेच्या १० जुलै रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये लीज मंजूर करण्यात आलेल्या विषयाची सत्तापक्षातील नगरसेवकांसह १३ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुन आव्हान दिले. या प्रकरणाच्या सावळ्यागोंधळाची चर्चा रंगत असतानाच पालिकेच्या स्वच्छता विभागात नालीसफाई, घंटागाडी, ट्रॅक्टर या मध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचा आणि याला नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे आणि आरोग्य निरीक्षक भूषण सालवटकर जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवकांनी पत्रपरिषदेत केला आहे. या भ्रष्टाचाराचे लोण पाणीपुरवठा आणि विद्युत विभागामार्फत पोहोचल्याचे त्यांनी म्हटले आहे. वरोरा येथील बगीच्यामध्ये दोन विहिरी असून एक हॅडपंप आणि एक ट्युबवेल आहे. बागेतील झाडांना पाणी देणे आणि पाण्याची इतर गरज भागविण्यासाठी ही व्यवस्था पुरेशी असताना नगर परिषदेने या बगिच्यामध्ये आणखी एक ट्युबवेल टाकण्यासाठी अलिकडे निविदा काढली आहे. हा प्रकार म्हणजे जुनेच काम नव्याने दाखवून भ्रष्टाचार करण्याचा प्रकार असल्याचा आरोप नगरसेवकांचा आहे.
वरोरा शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि प्रत्येक वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांवर नगर परिषदेतर्फे पथदिव्यांच्या सहाय्याने विद्युत प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकाश व्यवस्थेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम कंत्राटराकडे आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या खर्चामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
परंतु असे असताना शहराच्या अर्ध्याधिक भागातील पथदिवे सतत बंद असताना याबाबत तक्रार करुनही त्या तक्रारीचे वेळेवर निवारण होत नाही.
परंतु जबाबदारीने काम न करणाऱ्या कंत्राटदारांची देयके मात्र बरोबर काढल्या जातात. यामागे नगराध्यक्ष आणि सत्तापक्षातील काही नगरसेवकांचे अर्थपूर्ण राजकारण असल्याचा आरोप नगरसेवक राजू महाजन, छोटूभाई जैरुद्दिन, वैशाली तडसे, दिपाली टिपले, शांताराम लोहकरे, दर्शना सोयाम आणि उज्ज्वला बोढे या नगरसेवकांनी केला आहे. या सर्व प्रकरणांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करुन एका समितीमार्फत चौकशीची मागणी केली जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Electricity and water supply corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.