वरोरा शहरातील विद्युत कामे रेंगाळली
By Admin | Updated: August 23, 2015 01:31 IST2015-08-23T01:31:01+5:302015-08-23T01:31:01+5:30
शहरातील वीज वितरण प्रणाली भूमिगत करण्याची कामे केली जात असून वीज वितरण कंपनीने नव्याने ट्रान्सफार्मर बसविण्याचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे.

वरोरा शहरातील विद्युत कामे रेंगाळली
नागरिकांना मनस्ताप : कंत्राटदारावर कार्यवाहीची कॉंग्रेस कमिटीची मागणी
वरोरा: शहरातील वीज वितरण प्रणाली भूमिगत करण्याची कामे केली जात असून वीज वितरण कंपनीने नव्याने ट्रान्सफार्मर बसविण्याचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे. मात्र कंत्राट घेणाऱ्या कंपनीने मागील दोन वर्षांपासून अनेक कामे रेंगाळत ठेवली आहेत. त्याचा नागरिकांना अकारण मनस्ताप सहन करावा लागत असून अशा कंपनीचा परवाना तातडीने रद्द करुन कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी वरोरा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे.
दोन वर्षापूर्वी वरोरा शहरात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने वरोरा शहरात ३५ नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात यावे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डोंगरगाव चौक व वीर सावरकर चौकापर्यंत जुने एलटी, स्ट्रीट लाईट व घरगुती विद्युत पुरवठा सुरु राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून आरटीपीडी योजनेंतर्गत कामे सुनील हायटेक कंपनीला देण्यात आलीत.
या कंपनीने ट्रान्सफार्मर बसविण्याचे कामे पूर्ण केली. मात्र भूमिगत केबल टाकण्याचे काम मागील दोन वर्षांपासून केले नाही. काही ट्रान्सफार्मची कामे अर्धवट आहेत.
येत्या काही दिवसांत गणेशोत्सव, नवरात्रं आदी उत्सव येत आहेत. या अर्धवट कामांमुळे या उत्सवात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेही कामे तातडीने पूर्ण करावी अन्यथा कंत्राट घेणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द करण्याची मागणी नगरसेवक तथा वरोरा कॉंग्रशहर अध्यक्ष छोटू शेख, लक्ष्मण गमे, आसीफ रजा, भोयर, कोहपरे, बाबा ठाकरे, आगबत्तनवार, गिद्देवार, अनिल झोटींग, सचिन मेश्राम, राहुल देव, संदीप विधाते, कादर शेख, चंद्रकांत पोटे, पाल, प्रफुल्ल लाखे आदींनी केले आहे.
सदर निवेदन वीज वितरण कंपनीचे वरोरा येथील कार्यकारी अभियंता, विधीमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आदींना देण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)