कृउबासच्या ११ जागांसाठी ५ मार्च रोजी निवडणूक
By Admin | Updated: February 27, 2017 00:40 IST2017-02-27T00:40:51+5:302017-02-27T00:40:51+5:30
नागभीड कृउबासच्या सात जागा आधिच अविरोध निवडून आल्याने आता ११ जागांसाठी ५ मार्च रोजी निवडणूक होत आहे.

कृउबासच्या ११ जागांसाठी ५ मार्च रोजी निवडणूक
नागभीड कृउबास निवडणूक : सात संचालक अविरोध
नागभीड : नागभीड कृउबासच्या सात जागा आधिच अविरोध निवडून आल्याने आता ११ जागांसाठी ५ मार्च रोजी निवडणूक होत आहे. सहकारी संस्था गटातील सर्वच सातही सर्वसाधारण जागा अविरोध आल्याने या निवडणुकीतील रसच निघून गेल्याच्या प्रतिक्रिया यासंदर्भात व्यक्त होत आहेत.
नामांकन परत घेण्याचे दिवशी सहकारी संस्था गटातील अनेक उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतल्याने सहकारी संस्था गटातील सातही संचालक अविरोध निवडून आले. यात भाजपच्या सहा तर काँग्रेसच्या एका संचालकाचा समावेश आहे. आता सहकारी संस्था गटातील दोन महिला संचालकांकरिता एक इतर मागासवर्गीय आणि एक विमुक्त व भटक्या जमातीमधील संचालकाकरिता निवडणूक होणार आहे.
यासोबतच ग्रामपंचायत मतदार संघातील चार संचालक, अडते, व्यापारी व प्रक्रियादार मतदार संघातून दोन हमाल मापारी मतदारसंघातून एक संचालक निवडून द्यायचा आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम ३० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला आणि १० फेब्रुवारी रोजी सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण सात संचालक अविरोध निवडून आले असले तरी जि.प. व पं.स.च्या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे या निवडणुकीची म्हणावी तेवढी चर्चा झाली नाही.
आता जि.प. आणि पं.स. निवडणुकीची रणधुमाळी संपल्याबरोबर बाजार समितीच्या निवडणुक चर्चेने आणखी उचल खाण्यास सुरुवात झाली आहे, अविरोध निवडून आलेल्या सात जागांपैकी सहा जागा भाजपच्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सहकारी संस्था मतदार संघ, हमाल मापारी मतदार संघ आणि अडते व्यापारी मतदार संघातही भाजप पुरस्कृत पॅनलचे पारडे जड असल्याची चर्चा असून ग्रामपंचायत मतदार संघाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे बोलल्या जात आहे.
नुकत्याच झालेल्या जि.प. व पं.स. निवडणुकीत काँग्रेसचे बहुसंख्य उमेदवार निवडून आल्याने काँग्रेस जणांचा आत्मविश्वास वाढला आहे. इतर मतदार संघात नाही, पण ग्रामपंचायत मतदार संघात काँग्रेस लक्ष केंद्रीत करुन शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)