बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारांची रणधुमाळी
By Admin | Updated: April 7, 2016 00:42 IST2016-04-07T00:42:47+5:302016-04-07T00:42:47+5:30
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक १७ एप्रिलला होत आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारांची रणधुमाळी
६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात : १७ एप्रिलला होणार निवडणूक
बल्लारपूर : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक १७ एप्रिलला होत आहे. या निवडणुकीत एकूण १८ जागेसाठी ६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या बाजार समितीवर ताबा मिळविण्यासाठी दोन आघाड्यात सत्ता संघर्ष निर्माण झाला असून सहकारी संस्था मतदार संघात चुरस निर्माण झाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत विजयासाठी उमेदवारांची रणधुमाळी सुरू झाली आहे.
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था मतदार संघात सर्वाधिक ११ जागा असून २४ उमेदवारांनी निवडणुकीत दंड थोपटले आहे. येथे पुरुष गटातील ९ जागेसाठी १८ तर महिला राखीव गटातील दोन जागेसाठी चार महिला उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये बाजार समितीचे उपसभापती गंगाधर वैद्य, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश चोखारे, गोविंदा पोडे, विद्यमान संचालक अलका वाढई, विजय टोंगे यांच्यासह अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून मतांची आर्जव करीत आहेत. सेवा सहकारी संस्था मतदार संघात दिग्गजांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे चुरस वाढणार आहे.
ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागेसाठी नऊ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. येथे सर्वसाधारण गटातील दोन जागेसाठी सहा, अनुसूचित जाती/जमाती गटात एका जागेसाठी तीन तर आर्थिक दुर्बल गटातील एका जागेसाठी दोन उमेदवारात लढत होत आहे. व्यापारी/अडते मतदार संघातील दोन जागेसाठी पाच उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. हमाल व मापारी मतदार संघातून एका जागेवर दोन उमेदवार एकमेकांना आव्हान देत आहेत. या मतदार संघात केवळ ६५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सहकारी संस्था मतदार संघातील महिला राखीव गटातील दोन जागेसाठी शोभा वरारकर, अल्का वाढई, मालन आयलनवार व वत्सला ताजने यांच्यात लढत होत असून एकमेकींना शह देण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतर मागास प्रवर्ग गटातील एका जागेवर नीरज बोंडे व श्रीकृष्ण धोडरे यांच्यात सरळ लढत होत आहे. सहकारी संस्था मतदार संघातीेल विमुक्त जाती व भटक्या जाती प्रवर्गातील एका जागेसाठी शीला मेकलवार, प्रकाश पचारे व संजय सिंगम यांच्यापैकी एकावर मतदार शिक्कामोर्तब करणार आहेत. चंद्रपूर बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक प्रमुख दोन आघाड्यात लढली जात असून उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. या निवडणुकीत मतदारांना पसंतीच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारण गटासाठी पांढरा, महिला राखीव गटासाठी गुलाबी, इतर मागास प्रवर्गासाठी निळा तर विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी पिवळ्या रंगात मतपत्रिका राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)