महेशनगर येथील ज्येष्ठांनी श्रमदानातून स्वच्छ केले मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:29 IST2021-01-25T04:29:15+5:302021-01-25T04:29:15+5:30
चंद्रपूर : नागरिकांनी ठरविले तर काेणतेही काम अशक्य नाही. असेच काम महेश नगर येथील ज्येष्ठ नागरिकांनी करून दाखवित इतरांसमोर ...

महेशनगर येथील ज्येष्ठांनी श्रमदानातून स्वच्छ केले मैदान
चंद्रपूर : नागरिकांनी ठरविले तर काेणतेही काम अशक्य नाही. असेच काम महेश नगर येथील ज्येष्ठ नागरिकांनी करून दाखवित इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. तरुणांना लाजवेल असे काम येथील ज्येष्ठ नागरिकांनी श्रम दान करून केले आहे. त्यामुळे या ज्येष्ठांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
तुकूम परिसरातील होमगार्ड प्रशिक्षण केंद्राजवळ खुली जागा आहे. या जागेवर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे तसेच डुकरांचा हैदोस होता. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा परिसरातील नागरिकांना डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांनाही सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, काही असामाजिक तत्त्वांचे नागरिक आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी या जागेचा वापर करीत होते. या सर्वांमुळे परिसरातील नागरिक चांगलेच वैतागले होते. त्यानंतर येथील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत या मैदानाचा योग्य वापर करण्याचे ठरविले. एक-एक करीत मोठ्या प्रमाणात येथे ज्येष्ठ नागरिक गोळा झाले. या मैदानाचा वापर विरंगुळा केंद्र म्हणून करण्याचे ठरविले. त्यासंदर्भात लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाकडे निवेदन देणे सुरू केले. मात्र अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे बघून ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:च हातात कुदळ, पावडे घेऊन मैदान स्वच्छ करण्यास प्रारंभ केला. यामध्ये एक-एक करीत अनेक हात कामाला लागले आणि आज येथील मैदान मोकळे झाले. येथील झुडपे तोडून केरकचरा साफ करण्यात आला. या मैदानामध्ये ज्येष्ठ नागरिक केंद्र मंजूर करून येेथे विरंगुळा केंद्र, बालउद्यान, वाचनालय व स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी प्रशासनाला निवेदनही दिले आहे.
मैदानाची स्वच्छता तसेच प्रशासनाला निवेदन देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ, महेशनगर तुकुम, येथील सल्लागार विश्वनाथ तामगाडगे, अध्यक्ष गुलाबराव लोनकर, सचिव बाबाराव पडवे, गजानन पिदुरकर, दयाराम उराडे, तुळशीराम नरड, सुरेश तराडे, वामन मंदे, उमाजी देठेकर, प्रभाकर देठेकर, शंकर गेडेकर, संध्या सहस्त्रबुद्धे, रत्नमाला नरड, वृषाली बुरिले, सुरेखा लडके आदींनी परिश्रम घेतले.
---
बाॅक्स
विविध उपक्रम
या मैदानाचा योग्य वापर करण्याचे ठरविण्यात आले असून, २६ जानेवारी रोजी दुपारी १२.३० ते ५.३० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ फलकाचे उद्घाटन, नि:शुल्क आरोग्य तपासणी, वाढत्या प्रदूषणावर जनजागृती, योग निसर्गोपचार व प्रदर्शनी, महिलांचे हळदीकुंकू, वृक्षारोपण, परसगाव, प्रदर्शनी, बचतगट व यशोगाथा व समस्या यावर मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मान्यवरांचा सत्कारही आयोजित करण्यात आला आहे.