बल्लारपूर पंचायत समितीत एकता दिवस

By Admin | Updated: November 1, 2015 01:15 IST2015-11-01T01:15:34+5:302015-11-01T01:15:34+5:30

भारताच्या माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात...

Ekta Day in Ballarpur Panchayat Samiti | बल्लारपूर पंचायत समितीत एकता दिवस

बल्लारपूर पंचायत समितीत एकता दिवस

मान्यवरांचे मार्गदर्शन : कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ
बल्लारपूर : भारताच्या माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम, संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, लक्ष्मी कुमरे, सुवर्णा जोशी, कनिष्ठ अभियंता प्रकाश शेंडे, राजेश गाडगे, अभियंता रमेश श्रीवास्तव, सुशील गुंडावार, प्रदीप तांडुरवार यांची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना अ‍ॅड. हरीश गेडाम म्हणाले, भारताचे माजी गृहमंत्री स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. स्थानिकांचे विलिनीकरण करून लोकशाही व्यवस्थेला बळकट केले. त्याचप्रमाणे स्व. इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकतृत्वाच्या बळावर देशाला नवी दिशा दिली. देशाची एकता, अखंडता व सुरक्षा राखण्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे देश प्रगतीकडे वाटचाल करू लागला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजच्या राजकारणी मंडळींना नवी दिशा देणारी ठरली आहे, असे त्यांनी मनोगतातून सांगितले. अनेकश्वर मेश्राम, बी.बी. गजभे यांनीही स्व.सरदार वल्लभभाई पटेल व माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आदरांजली अर्पण केली. संचालन लक्ष्मी कुमरे यांनी तर आभार सुनील नुत्तलवार यांनी मानले. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
विकासाकडे दुर्लक्ष
खांबाडा : येथील ग्राम पंचायत सदस्यांच्या दुर्लक्षामुळे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ गाळ साचला आहेत. नाल्यामध्ये जंतु व अळ्या पडल्या आहेत. खांबाडा-बोपापूर या मुख्य रस्त्यावर नळाचे पाणी वाहत आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Ekta Day in Ballarpur Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.