एकार्जुना पालावर २५ विद्यार्थी शाळाबाह्य
By Admin | Updated: March 19, 2016 00:48 IST2016-03-19T00:48:06+5:302016-03-19T00:48:06+5:30
‘स्कूल चले हम’, ‘चला शिकू या, पुढे जाऊ या’, ‘साक्षरता मिशन’, ‘सर्व शिक्षा अभियान’ अशी कितीतरी शासकीय मिशनस् आहेत.

एकार्जुना पालावर २५ विद्यार्थी शाळाबाह्य
योजना फसव्या : पालावर अशिक्षितांचे प्रमाण अधिक
विनेशचंद्र मांडवकर नंदोरी
‘स्कूल चले हम’, ‘चला शिकू या, पुढे जाऊ या’, ‘साक्षरता मिशन’, ‘सर्व शिक्षा अभियान’ अशी कितीतरी शासकीय मिशनस् आहेत. यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधीचा खर्च करते. मात्र शिक्षणापासून वंचित असलेली मुले या अभियानाला आव्हान देणारी ठरत असल्याचा प्रत्यय नंदोरी जवळील एकार्जुना येथे असलेल्या भटक्यांच्या पालावरून येत आहे.
१२ वर्षाच्या इमामदीने ही वास्तविकता प्रकाशात आणली असून एकार्जुना पालावर आजही २० ते २५ मुले शाळा व शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. नंदोरीनजीक असलेल्या विस्लोन येथे मूर्ती, विळ्या विक्रीसाठी ही मुलगी आली असता प्रस्तुत प्रतिनिधीने तिला बोलते केले.
कर्नाटक राज्यातील जिल्हा गुलबर्गा तालुका चिंचोली व गाव कोटगा. कर्नाटकातील कोटगा हे तिचे गाव आहे. वंशपरंपरेने मूर्ती व पावश्या तयार करणे. ते विकून उदरनिर्वाह करणे व पोटाची खडगी भरण्यासाठी गावोगाव भटकणे हा त्यांचा व्यवसाय. इमामदी खासिम अली शेख हे तीचं पूर्ण नाव आहे. तिला कोणत्या शाळेत शिकते असे विचारले असता शिकत नसल्याची ती सांगते.
पांढरपेशांची तिला भीती वाटते. पालावरील रबू, अशरूफ, आरीफा, इनाम व अबू तसेच २०-२५ मुले शाळेत जात नाहीत व पूर्णता निरक्षर असल्याची माहिती तिचे मेहुणे इब्राहीम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.