आठ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:33+5:302021-01-13T05:12:33+5:30
पठाणपुरा परिसरातील नाल्यांचा उपसा करा चंद्रपूर : पठाणपुरा परिसरातील नाल्या घाणीने तुंबल्या आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ...

आठ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हा दाखल
पठाणपुरा परिसरातील नाल्यांचा उपसा करा
चंद्रपूर : पठाणपुरा परिसरातील नाल्या घाणीने तुंबल्या आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नाल्यांमध्ये घाण साचून असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला. मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने या वॉर्डात पाठविण्याची मागणी नागरिकांनी केली.
रस्त्यावर वाहन उभ्या करणाऱ्यांवर कारवाई
चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन उभी करून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या नऊ वाहनचालकांवर वेगवेळ्या ठिकाणी पोलिसांनी रविवारी कारवाई केली. यामध्ये चंद्रपूर पाच व बल्लारपुरातील चौघांचा समावेश आहे. वाहनचालकांवर कलम २८३ अन्वये कारवाई केली.
दुर्गापूर मार्गावर गतिरोधकाची मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर ते दुर्गापूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. परंतु बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. सकाळी व सायंकाळी नागरिकांची गर्दी असते. संभाव्य धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने गतिरोधक बांधावे, अशी मागणी आहे.
हरिओम नगरातील पथदिवे बंद
चंद्रपूर : येथील हरिओम नगर परिसरातील काही पथदिवे बंद आहेत. याबाबत नागरिकांनी मनपाचे लक्ष वेधले. नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी पथदिवे लावण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
कृषी पदांमुळे कृषी योजना कागदावरच
सिंदेवाही : कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध योजना पोहोचविताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. राज्य व केंद्र शासनाने शेतीसाठी अनेक योजना सुरू केल्या. जिल्हा परिषदेच्याही विविध योजना आहेत; पण, या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही.
अतिक्रमण हटाव मोहीम थंडबस्त्यात
चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. काही अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण हटविले. मात्र, बरीच अतिक्रमणे जैसे-थेच आहेत. या मार्गावर दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी मनपाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सुमित्रानगरातील बांधकाम अर्धवट
चंद्रपूर : तुकूम सुमित्रानगर परिसरात नाली बांधकाम न झाल्याने विविध वाॅर्डांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना चिखलातून वाट काढत पुढे जावे लागते. महानगरपालिका प्रशासनाने निधीची तरतूद करून नाली बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाबूपेठ परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातील रस्ता उखडला असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वरोऱ्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी
वरोरा : येथील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणीचे गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
निधीअभावी कंत्राटदारांनी बांधकाम थांबविले
मूल : तालुक्यातील सिमेंट रस्ते बांधकामासाठी १४व्या वित्त आयोगाचा निधी वापरला जात आहे. बहुतेक ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कंत्राटदाराने कामे थांबविल्याचे दिसून येते. अर्धवट कामांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यांसाठी निधी देण्याची मागणी केली जात आहे.
अनावश्यक सेवांनी मोबाइलधारक त्रस्त
ब्रह्मपुरी : मोबाइलचा वापर सर्वत्र वाढला आहे. पण कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडीमार ग्राहकांवर केला जात आहे. यामुळे मोबाइलधारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे करतात; पण त्याचा निपटारा होत नसल्याने ग्राहकवर्ग त्रस्त झाला आहे.
टेमुर्डा येथे मोकाट
जनावरांचा हैदोस
टेमुर्डा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण झाली. काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गायीचा मृत्यू झाला होता. जनावरांमुळे दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत
सिंदेवाही : जिल्ह्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. मात्र, पोलीस व परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत असून, यात काहींना जीव गमवावा लागला. त्यामुळे वाहतूक शाखेने याकडे लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहतूकदारांवर तत्काळ कारवाई करण्याची मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा
चंद्रपूर : शहरातील चोर खिडकी, इंदिरानगर परिसरात मोकाट डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य असून, विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महानगरपालिकेने डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.