आठजणांनी केला प्लाझ्मा दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:01:27+5:30

कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी ही अनेक रूग्णांना वरदान ठरत आहे. या थेरपीत कोरोनातून बरा झालेल्या रूग्णांच्या रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील कोविड विरोधक अ‍ॅन्टीबॉडी दुसऱ्या रूग्णाला दिल्या जातात. त्यामुळे रुग्णांना या आजारातून बाहेर काढणे काही प्रमाणात का, होईना शक्य आहे.

Eight Citizen donated plasma | आठजणांनी केला प्लाझ्मा दान

आठजणांनी केला प्लाझ्मा दान

ठळक मुद्देजनजागृतीचा परिणाम : कोरोनारूग्णांसाठी ठरणार फायदेशीर

साईनाथ कुचनकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना आजारावर सध्यातरी कोणतेही औषध उपलब्ध नसल्यामुळे प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करून त्यांना आधार दिला जात आहे. मात्र, प्राझ्मा दान दिल्यामुळे अशक्तपणा येत असल्याच्या गैरसमजाने प्लाझ्मा दान करण्यासाठी कोणीच समोर येत नव्हते. परिणामी आरोग्य यंत्रणेचा ताण वाढला होता. मात्र, मागील महिनाभरात जिल्ह्यात आठ जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी ही अनेक रूग्णांना वरदान ठरत आहे. या थेरपीत कोरोनातून बरा झालेल्या रूग्णांच्या रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील कोविड विरोधक अ‍ॅन्टीबॉडी दुसऱ्या रूग्णाला दिल्या जातात. त्यामुळे रुग्णांना या आजारातून बाहेर काढणे काही प्रमाणात का, होईना शक्य आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनातून बरे झालेले रुग्ण समोर येत नसल्यामुळे गंभीर रुग्णांवर याद्वारे उपचार करणे जिल्ह्यात सध्यातरी अशक्य होते.
एका प्लाझ्मा दानातून दोन रूग्ण बरे होऊ शकतात. त्यामुळे अधिकाधिक प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रक्तपेढीत आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या आठ दाते समोर आले असून त्यांनी प्लाझ्मा दान केले आहे.
सुरूवातीला प्लाझ्मा दान करण्याबाबत भीतीचे वातावरण होते. प्लाझ्मा दान केल्यामुळे अशक्तपणा तर येणार नाही ना, प्लाझ्मा दिल्यानंतर कोरोना झाला तर काय करायचे, प्लाझ्मा म्हणजे नेमके काय असे अनेक प्रश्न दात्यांना पडले आहे. यातील काहींची शंका निरसन करणे आरोग्य यंत्रणेला शक्य झाल्यामुळे प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात हळुहळू वाढत आहे. मागील महिनाभरात आठ जणांना प्लाझ्मा दान करून आपले कर्तव्य बजावले आहे. रक्तदान शिबिरासारखेच आता आरोग्य विभाग तसेच काही सामाजिक संस्था प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. त्याचाच परिणाम आता पडत असून कोरोनातून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करण्यासाठी समोर येत आहेत.
कोरोनाचा संसर्गामुळे जिल्हावासीय घाबरले आहे. अशातच जिल्ह्यात आतापर्यंत नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशावेळी गंभीर रुग्णांना प्लाझ्मा देण्याची तयार आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

जनजागृतीमुळे डोनर आले समोर
कोरोना आजारावर सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध नाही. यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करून लस शोधण्याचे काम करीत आहेत. मात्र ती रुग्णांपर्यंत केव्हा पोहचेल हे अद्यापतरी सांगता येत नाही. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णाला या आजारातून बाहेर काढण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत आहे. यासाठी आरोग्य विभाग त्यादृष्टीने प्रयत्न करीत असुन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. यामुळे जिल्ह्यात मागील काही दिवसात प्लाझ्मा डोनर समोर येत असून त्यांनी निसंकोचपणे प्लाझ्मा दान केले आहे.

मागील काही दिवसामध्ये प्लाझ्मा थेपरीसंदर्भात जनजागृती केली जात आहे. त्यामुळे हळूहळू डोनर समोर येत आहे. एका महिन्यामध्ये चंद्रपूरमध्ये आठ जणांना प्लाझ्मा दान केले आहे. कोरोनाच्या रुग्णांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यातील अन्य नागरिकांनीही समोर येणे गरजेचे आहे.
- डॉ. अमित प्रेमचंद, प्रभारी ब्लड बँक अधिकारी,
जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर

राज्य शासनाने कोरोनाच्या उपचारासाठी रूग्णालयांना प्लाझ्मा थेरपी या उपचार पध्दतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागानेही तयारी सुरु केली आहे. सध्यातरी जिल्ह्यात एकाही रुग्णाला प्लाझ्मा थेरपी करण्यात आली नाही. मात्र प्लाझ्मा डोनरने प्लाझ्मा दान करून आपले कर्तव्य पार पडले आहे.

Web Title: Eight Citizen donated plasma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.