जागृती मोहीम प्रभावीपणे राबवा

By Admin | Updated: September 21, 2014 23:48 IST2014-09-21T23:48:45+5:302014-09-21T23:48:45+5:30

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे, या उद्देशाने मतदार जागृती कार्यक्रम

Effectively implement awareness campaign | जागृती मोहीम प्रभावीपणे राबवा

जागृती मोहीम प्रभावीपणे राबवा

चंद्रपूर : लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे, या उद्देशाने मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा, अशा सूचना मतदार जागृती निवडणूक निरीक्षक कृपाशंकर यादव यांनी दिल्या.
यावेळी निवडणूक आयोगाने प्रथमच मतदार जागृती निवडणूक निरीक्षकाची नियुक्ती केली असून, मतदार जागृतीसंबंधी कृपाशंकर यादव यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलिल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर नान्हे व समितीचे सदस्य उपस्थित होते.
मतदारांना यादीतील आपल्या नावाची खात्री करता यावी, यासाठी आयोगाच्या तसेच जिल्हा कार्यालयाच्या संकेतस्थळावर याद्या उपलब्ध आहेत. तरीही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक दिवस सर्व मतदार केंद्रावर याद्या उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.
नव्याने मतदान करणाऱ्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना या परिचितांना मतदानासाठी प्रेरित करावे, असे कार्यक्रम राबविण्याचा सल्ला यादव यांनी दिला. शहरी व ग्रामीण भागात असणाऱ्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून मतदार जागृती मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
या दृष्टीने अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्यामार्फत गृहभेट, किशोरी समिती, माता भेट घेऊन त्यांना मतदानाचे महत्व समजावून सांगण्यासोबतच मतदान करण्यासाठी प्रेरित करता येऊ शकते. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक, याप्रमाणे मतदार सुविधा केंद्र उघडण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात व्हीव्हीपॅटचे डेमो दाखविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. शाळा, महाविद्यालय, शहर व ग्रामीण भागात कलापथक तसेच पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय फ्लेक्स, बॅनर, पोस्ट याद्वारे जागृती करण्यात येईल. मतदान स्लीप लवकर वितरित करण्याचा विचार असल्याचे त्यांनी या बैककीत सांगितले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Effectively implement awareness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.