चंद्रपूर महानगरातील पाणी टंचाई निवारणार्थ प्रभावी उपाययोजना कराव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:28 IST2021-04-17T04:28:06+5:302021-04-17T04:28:06+5:30
चंद्रपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. यासंदर्भात त्वरित योग्य नियोजन केले नाही तर ...

चंद्रपूर महानगरातील पाणी टंचाई निवारणार्थ प्रभावी उपाययोजना कराव्या
चंद्रपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. यासंदर्भात त्वरित योग्य नियोजन केले नाही तर मे महिन्यात शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, ही बाब लक्षात घेता त्वरित प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
या विषयासंदर्भात त्यांनी झूमद्वारे बैठक घेतली व चर्चा केली. बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, मजीप्राचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.
इरई नदीवर बंधारा बांधण्यासाठी व त्या माध्यमातून पाण्याची साठवणूक करण्यासाठी महानगरपालिकेने त्वरित अंदाजपत्रक जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या तसेच महानगरातील पाणी टंचाईचा आराखडा शासनाला सादर करून उपाययोजनांसाठी निधीची मागणी करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. विहिरी व बोअरिंगच्या पाण्याची तपासणी करून पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याबाबतचे फलक जलस्त्रोतांशेजारी लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सार्वजनिक ठिकाणच्या बोअरिंग्ज जवळ रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आ. मुनगंटीवार यांच्या सूचनांच्या अनुषंगाने या विषयाबाबत सर्व आवश्यक बाबी तपासून कार्यवाही करण्यात येईल तसेच महानगरातील पाणी टंचाईचा आराखडा शासनाकडे पाठवून त्यासाठी निधीची मागणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले.