ब्रह्मपुरीतील कुक्कुसापासून तयार केलेले खाद्यतेल देशात दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 14:16 IST2022-01-24T14:06:12+5:302022-01-24T14:16:36+5:30

धानापासून तांदूळ तयार करताना कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या कुक्कुसात काही टक्के तेलाचे प्रमाण असते. या कुक्कुसापासून तयार होणारे खाद्यतेल (rice bran oil) मानवी आरोग्याला पोषक असून त्याला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे.

edible oil made from rice bran in Bramhapuri ranks second in the country | ब्रह्मपुरीतील कुक्कुसापासून तयार केलेले खाद्यतेल देशात दुसऱ्या क्रमांकावर

ब्रह्मपुरीतील कुक्कुसापासून तयार केलेले खाद्यतेल देशात दुसऱ्या क्रमांकावर

ठळक मुद्देचंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

दत्तात्रय दलाल

चंद्रपूर : शैक्षाणिक नगरी अशी ओळख असलेल्या ब्रह्मपुरी शहरातून अनेक दिग्गज निर्माण झाले आहेत. त्यात आता मानाचा नवा तुरा येथील रामदेवबाबा साल्वंट प्रा. लिमिटेडने रोवला आहे. देशातील राइस ब्रॅन्ड खाद्यतेल बनविण्यात उच्च प्रतीचे खाद्यतेल म्हणून तुलसी राइस ब्रॅन्ड खाद्य तेलाचा देशात दुसरा क्रमांक लागलेला आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी शहराची औद्योगिक नगरी म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे.

ब्रह्मपुरी शहराची महाराष्ट्रात विविध कारणांनी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उच्चशिक्षित होऊन अनेक दिग्गज या भूमीत निर्माण झाले आहेत. शहरात तसेच तालुक्यात मोठ्या राइस मिल आहेत. पूर्वी धान भरडाई केल्यानंतर शिल्लक कुक्कुस जनावरांचा चारा म्हणून वापरला जात होता. काही वर्षांपूर्वी येथील रामदेवबाबा साल्वंट प्रा. लिमिटेडने कुक्कुसापसून तुलसी खाद्य तेल तयार करण्याला सुरुवात केली. महाराष्ट्रात एकमेव राइस ब्रॅन्ड तेल निर्माण करणारी ही कंपनी आहे.

दररोज १०० मेट्रिक टन उत्पादन

ब्रह्मपुरी येथे दररोज शंभर मेट्रिक टन खाद्य तेलाचे उत्पादन घेण्यात येते. तर नागपूर जिल्ह्यात मोहदा येथे दुसरा कारखाना निर्माण केला आहे. त्यातही कुक्कुसावर प्रक्रिया करून शंभर मेट्रिक टन तुलसी खाद्य तेल तयार करण्यात येते.

५०० हून अधिक नागरिकांना मिळाला रोजगार

कुक्कुसावर प्रक्रिया करून तेल तयार करण्यात येत असल्याने धानाला जास्त दर मिळतो. विदर्भातील कुक्कस छत्तीसगड राज्यात जात होता. त्यामुळे जास्त किराया द्यावा लागत होता. आता मात्र, विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. या कंपनीत स्थानिक पाचशेहून अधिक नागरिकांना रोजगार मिळालेला आहे. मागील सप्टेंबर महिन्यात एका कार्यक्रमात कुकुसापासून उच्च प्रतीचे राइस ब्रॅन्ड तुलसी खाद्य तेल बनविणारी भारतात दुसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून गोवा ( पणजी) येथे गौरव करण्यात आला.

भारत आयात खाद्यतेलावर अवलंबून आहे. ते कमी करण्यासाठी मेड इन इंडिया या तत्त्वाला अनुसरून भारतातच उच्च प्रतीच्या कुक्कुसावर प्रक्रिया करून खाद्यतेल निर्मिती करण्यात येते. मागील सात वर्षांपासून कुक्कुसावर प्रक्रिया करून खाद्यतेल निर्मिती करण्यात येत आहे. हे तेल छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांत निर्यात करण्यात येते.

- नीलेश मोहता, संचालक, रामदेवबाबा साल्वंट प्रा. लिमिटेड, ब्रह्मपुरी

Web Title: edible oil made from rice bran in Bramhapuri ranks second in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.