वर्धा नदीची धार आटली
By Admin | Updated: April 21, 2016 01:14 IST2016-04-21T01:14:41+5:302016-04-21T01:14:41+5:30
वरोरा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार आटली आहे. त्यामुळे वरोरा शहर वासीयांना नदीचे शुध्द पाणी मिळणे दुरपास्त झाले आहे.

वर्धा नदीची धार आटली
वरोरावासींसमोर पाणी टंचाईचे संकट : नदीतील बंधारा ठरला कुचकामी
वरोरा : वरोरा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार आटली आहे. त्यामुळे वरोरा शहर वासीयांना नदीचे शुध्द पाणी मिळणे दुरपास्त झाले आहे. पालिका प्रशासनाने एप्रिल महिन्यात पाणी अडविण्याकरिता तात्पुरता बंधारा बांधला. यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार न.प. प्रशासनाने चालविल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसून येत आहे.
चालू वर्षीच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने एप्रिल, मे महिण्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार हे प्रारंभापासून सर्वत्र दिसून येत होते. त्यामुळे नदी, विहीरी, ट्युबवेल हातपंपमधील पाण्याची पातळी खोल जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. असे असताना दरवर्षी नदीमध्ये बऱ्यापैकी पाणी असताना नदीच्या पात्रात वरोरा न.प. च्या वतीने तात्पुरता बंधारा बांधुन नदीतील पंपवेलजवळ पुरेसा पाणी साठा टिकवून ठेवण्यास मदत होत होती. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना नदीचे शुद्ध पाणी मिळत होते. परंतु, नदी पात्रातील हा तात्पुरता बंधारा नदीची धार आटल्यानंतर एप्रिल महिन्याच्या १७ तारखेला बांधण्यात आल्याने यामध्ये सध्यातरी पाणी अडेल किंवा नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
न.प. च्या पाणी पुरवठा विभागाने धरणातील पाणी आरक्षीत केले आहे. धरणातील पाणी सोडल्यानंतर या तात्पुरता बंधाऱ्यात पाणी अडेल असे मानले जात असले तरी धरणातून पाणी सोडल्यानंतर तुळाना घाटाजवळ पाणी येण्याकरिता आठ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
दर बुधवारी पाणीपुरवठा बंद
नदीतून वरोरा शहरवासीयांना दररोज देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात यावेळी कपात करण्यात आली आहे. आठवड्यातील प्रत्येक बुधवारी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरणातील पाणी न.प.ने आरक्षित केला असून वर्धा नदीची धार आटल्याने आरक्षित पाणी सोडण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहे.
- पुरुषोत्तम खिरटकर, सभापती, पाणी पुरवठा विभाग, वरोरा