पेरणीअभावी तालुक्यातील शेतमजुरांवर आर्थिक संकट
By Admin | Updated: July 3, 2014 23:30 IST2014-07-03T23:30:47+5:302014-07-03T23:30:47+5:30
राज्यात पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतमजुरांना त्याची धग सोसावी लागत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पेरणीचे प्रमाण सरासरी चार ते पाच टक्केच आहे. पेरणीच नसल्याने

पेरणीअभावी तालुक्यातील शेतमजुरांवर आर्थिक संकट
ब्रह्मपुरी : राज्यात पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतमजुरांना त्याची धग सोसावी लागत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पेरणीचे प्रमाण सरासरी चार ते पाच टक्केच आहे. पेरणीच नसल्याने शेतमजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. त्यामुळे शेतमजुरांवर आर्थिक संकट आले आहे.
उन्हाळ्यातील शेतीच्या मशागतीनंतर पेरणीच्या वेळी जमा केलेल्या मजुरीच्या रकमेवर शेतमजुरांचे अर्थकारण अवलंबून असते. खरिपात पेरणी, निंदन, खरपन, ढवरणी, कापनीपर्यंत शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होतो. पेरणी न झाल्याने साहजिकच शेतमजुरांसमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. सुरुवातीचाच काळ संघर्षमय ठरल्याने संपूर्ण वर्षाचे अर्थकारणच बिघडण्याची चिन्हे असल्याचे शेतमजुरांनी सांगितले. पुरुषांना २०० रुपये प्रतिदिन तर महिलांना १०० रु. असे शेतमजुरीचे दर आहेत. पाऊस येण्याच्या आशेने काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने ग्रामीण भागाचा आढावा घेतला. ब्रह्मपुरी वरुन - वडसाकडे जाताना १० किमी वर हरदोलीजवळ एका शेतात पेरणी करणारा शेतमजूर निलकंठ ज्ञानेश्वर टिकले यांनी शेतमजुराचे अर्थकारण मांडले. पेरणीच्या दिवसात एक एकर शेतात बियाणे पेरण्यासाठी एक हजार रुपयापर्यंत मोबदला मिळतो. याकरिता बैलजोडी आणि काही मजूर लागत असतात.
मात्र सध्या पाऊसच नसल्याने पेरणीची कामे फारसी झाली नाहीत. गावोगावी जाऊन शेतमजुरांचा शोध घ्यावा लागतो.. या कामाकरिता कुटुंबातील सर्वच सदस्यांचा सहभाग असतो. तेवढीच अधिक मजुरी मिळत असते. (प्रतिनिधी)