२५० कोटींच्या निधीला अपूर्णतेचे ग्रहण
By Admin | Updated: November 15, 2014 01:27 IST2014-11-15T01:27:41+5:302014-11-15T01:27:41+5:30
चंद्रपूर शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. तरीही शहरातील ज्वलंत प्रश्न अद्यापही निकाली निघालेले नाही.

२५० कोटींच्या निधीला अपूर्णतेचे ग्रहण
रवी जवळे चंद्रपूर
चंद्रपूर शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. तरीही शहरातील ज्वलंत प्रश्न अद्यापही निकाली निघालेले नाही. एक ना अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. चंद्रपूर शहराने पंचशताब्दी वर्षात पाऊल ठेवताच राज्य शासनाने पंचशताब्दी महोत्सवानिमित्त २५० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. मात्र चंद्रपूर महापालिकेला लागलेल्या ग्रहणाची दूषित किरणे शहरावरही पडली. या हेड अंतर्गत मिळालेला २५ कोटींचा निधीही महापालिका अडीच वर्षात खर्च करू शकली नाही. केवळ १४ कोटी ५० लाखांचा निधी खर्च करून हाती घेतलेली कामे अपूर्ण व खरकटी करून ठेवली आहेत.
चंद्रपूरला नगरपालिका अस्तित्वात असतानाही नागरिकांच्या मूलभुत समस्या कायम होत्या. वारंवार नागरिकांच्या तक्रारी आल्या तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नव्हते. एखाद्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेच तर निधी नसल्याचे कारण नगरपालिकेकडून केले जायचे. चालढकल करीत चंद्रपूर शहराचा कारभार सुरू राहिला. त्यामुळे मूलभुत प्रश्न सुटू शकले नाही. रस्ते, स्वच्छ व शुध्द पाणी, गटारांचे तुंबणे, पूर, पार्कीगची सोय, विस्कळीत वाहतूक, अतिक्रमण आदी समस्यांचा यात समावेश होता. दरम्यान अडीच वर्षांपूर्वी चंद्रपूरला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. महानगरपालिका झाल्यामुळे निधी मिळेल आणि शहराचा झपाट्याने विकास होईल, असे प्रत्येकाला वाटले. चंद्रपूर शहराने पंचशताब्दी महोत्सव साजरा केला. याचे औचित्य साधून राज्य शासनाने शहराच्या विकासासाठी २५० कोटींचा स्वतंत्र पंचशताब्दीचा निधी देण्याची घोषणा केली. या निधीतून शहराचा कायापालट निश्चित होता. मात्र महानगरपालिकेला लागलेले ग्रहण यावेळीही सुटू शकले नाही. उलट या ग्रहणाचे दूषित किरणे शहरावर पडून शहरच ग्रहणांकित झाले.
२५० कोटींच्या निधीपैकी २५ कोटींचा पहिला हप्ता महापालिकेला मार्च २०१२ मध्ये प्राप्त झाला. या निधीतून झपाट्याने विकासकामे करून निधी संपविणे अपेक्षित होते. त्यानंतरच दुसरा हप्ता मिळणार होता. मात्र अडीच वर्षात महानगरपालिका २५ कोटींचा विकासही करू शकली नाही.
२५ कोटीपैकी केवळ १४ कोटी ५० लाख रुपयेच मनपाने खर्च केले. यातील काही निधी सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभागाला विविध कामांसाठी दिला होता, हे विशेष.(शहर प्रतिनिधी)