कार्यालयात सुरू करणार ई मॉनिटरिंग सर्व्हिस

By Admin | Updated: May 20, 2016 01:07 IST2016-05-20T01:07:30+5:302016-05-20T01:07:30+5:30

कार्यलयीन वेळेत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोहचतात अथवा नाही, शासकीय कामासाठी कोण बाहेर आहे...

E-monitoring service to be started in the office | कार्यालयात सुरू करणार ई मॉनिटरिंग सर्व्हिस

कार्यालयात सुरू करणार ई मॉनिटरिंग सर्व्हिस

नव्या जिल्हाधिकाऱ्यांची योजना : रिकाम्या खुर्च्यांवर चाप
चंद्रपूर : कार्यलयीन वेळेत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोहचतात अथवा नाही, शासकीय कामासाठी कोण बाहेर आहे हे एका क्लिकवर बघता यावे यासाठी ‘मॉनेटरिंग ई सर्व्हिस’ सुरू करण्याचा मनोदय जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या दिसणे योग्य नाही. बरेचदा दौऱ्याच्या नावाखाली काही कर्मचारी दांडी मारतात. त्यावर उपाय म्हणून ई मॉनिटरिंग सर्व्हिस सुरू करण्याचा विचार आहे. या माध्यमातून प्रत्येक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती केवळ जिल्हाधिकारी कार्यालयालाच नाही तर वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही बघता येईल, अशी व्यवस्था असेल. त्यातून कर्मचाऱ्यांच्या येण्याजाण्याच्या वेळांवर नियंत्रण राखले जाईल.
जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योजना विचारल्या असता जिल्हाधिकारी म्हणाले, दारूबंदी ही सक्तीने न करता मनपरिवर्तनातून केली जाणारी बाब आहे. त्यासाठी अधिकाधिक जनसहभाग घेतला जाईल. आपण ज्या जिल्ह्यातून आलो त्या ठिकाणीही दारूबंदी आहे. मात्र चंद्रपूरच्या दारूबंदीला अवघे एक वर्ष झाले आहे. त्यामुळे सकारात्मकपणे करता येण्यासारखे येथे बरेच काही आहे. कायद्यांच्या योग्य वापरासोबतच जनसहभागाच्या योजना राबवून या अंमलबजावणीत यश गाठण्याचा आपण प्रयत्न करू.
निकाल लागल्यानंतर जात प्रमाणपत्र मिळविताना विद्यार्थी आणि पालकांची होणारी दमछाक जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास पत्रकारांनी आणून दिली. त्यावर ते म्हणाले, तहसील स्तरावर यासाठी विशेष कक्ष उभारण्याचा मानस आहे. जाती प्रमाणपत्र देताना अधिकाऱ्यांनी दहावीच्या गुणपत्रिकेची अट न घालण्यासंदर्भात आपण लक्ष घालू. निकाल लागल्यावर धावपळ करण्यापेक्षा पालकांनी आधीच प्रमाणपत्रे मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली तर यंत्रणेवरील अर्धा ताण कमी होईल.
जिल्ह्यातील वाहतूक तसेच प्रदुषण नियंत्रणासंदर्भात योग्य दखल घेण्यासोबतच प्रदुषण नियंत्रण मंडळाला कामी लावले जाईल. उद्योग व्यवस्थापन, वेकोलि, वाहतुकदार संघटना, परिवहन विभाग या सह अन्य विभागांना सोबत घेवून काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: E-monitoring service to be started in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.