५०० शाळांत दिवाळीपर्यंत ई-लर्निंग सुविधा
By Admin | Updated: August 7, 2016 00:33 IST2016-08-07T00:33:36+5:302016-08-07T00:33:36+5:30
जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अद्ययावत शिक्षण ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी...

५०० शाळांत दिवाळीपर्यंत ई-लर्निंग सुविधा
अंगणवाड्या होणार स्मार्ट : पाच तालुके करणार शौचमुक्त
चंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अद्ययावत शिक्षण ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी येत्या दिवाळीपर्यंत किमान ५०० शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा सुरू करण्याचे लक्ष्य आखले आहे. येत्या दिवाळीपर्यंत ५०० आणि त्यानंतर मार्च २०१७ पर्यंत उर्वारित सर्व शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा सुरू करण्याची आखणी केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षी ब्रम्हपुरी, पोंभूर्णा, मूल, बल्लारपूर आणि चंद्रपूर या तालुक्यांना हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आखले आहे. बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त झाला असून केवळ त्याची पाहणी करून औपचारिक घोषणा बाकी असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा परिषदेला तीन हजार २०० शौचालय तयार करण्याचे उद्दिष्ट शासनाकडून मिळाले आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेने स्वयंप्रेरणेतून ५० हजार शौचालयांच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. या अंतर्गत आजवर ९ हजार ९०० शौचालयांची निर्मिती झाली आहे.
अंगणवाड्यांवरही जिल्हा परिषदेने लक्ष केंद्रीत केले असून अडीच हजार अंगणवाड्या परिपूर्ण बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जलयुक्त शिवारसाठी स्मार्ट फोटोग्राफी स्पर्धा ठेवली असून या योजनेअंतर्गत १२१ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत २०१५-१६ या वर्षात २५७ कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील २१० कामे पूर्ण झाली आहेत. त्यातून ६ हजार ४४७ टीसीएम पाण्याची साठवणूक झाल्याचा दावाही त्यांनी केला. यातून २ हजार ६२३ हेक्टर शेतीला सिंचनाचा फायदा होईल, असे ते म्हणाले. चालू २०१६-१७ वर्षात २१७ गावांची निवड यासाठी केली असून त्यापैकी ११ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाकडून २४० कामे केली जातील. एक हजार ६७८ मामा तलावांपैकी ४५० तलावांची दुरूस्ती पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पहाडावरील दोन गावे सीईओंनी घेतली दत्तक
सांसद आदर्श गाव योजना, आमदार आदर्श गाव योजनेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी कोरपना तालुक्यातील खिरडी आणि रूपापेठ ही दोन गावे दत्तक घेतल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. या गावांचा सर्वांंगीण विकास करण्यासाठी शासनाची चमू या गावांमध्ये कार्य करेल, त्यासाठी ही गावे निवडल्याचे ते म्हणाले.
गावांच्या प्लॅस्टिकमुक्तीसाठी अभिनव स्पर्धा
गावांमध्ये दिसणारे प्लॅस्टीकचे ढिग व त्यामुळे होणारी पर्यावरणाची बाधा लक्षात घेऊन देवेंद्र सिंग यांनी आता यासाठी अभिनव अशी विद्यार्थ्यांसाठी प्लॅस्टीक गोळा करण्याची स्पर्धा ठेवली असून त्यासाठी तालुका स्तरावर अणि जिल्हा स्तरावर प्रत्येकी तीन बक्षिसे ठेवली आहे. या स्पर्धेला विरोध अपेक्षित असला तरी विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणपुरक भावना निर्णाण व्हावी, यासाठी ही स्पर्धा घेतली जाईल.