धुळीने अर्धे ब्रह्मपुरीकर त्रस्त
By Admin | Updated: May 11, 2015 01:12 IST2015-05-11T01:07:56+5:302015-05-11T01:12:12+5:30
कोट तलावाच्या सौंदर्यीकरणाला ‘लोकमत’च्या दणक्याने वेग आला आहे.

धुळीने अर्धे ब्रह्मपुरीकर त्रस्त
ब्रह्मपुरी : कोट तलावाच्या सौंदर्यीकरणाला ‘लोकमत’च्या दणक्याने वेग आला आहे. तलावातील उपसा केलेली माती १ किमी अंतरावर काहाली रोडवर महसूलच्या जमिनीवर खड्यात फेकण्याचे काम सुरू आहे. परंतु, माती फेकण्याचे काम खुल्या टिप्परद्वारे केले जात असल्याने माती डांबरीरस्त्यावर पडत आहे. त्यामुळे धुळीने शहर ग्रासले असून अर्ध्या ब्रह्मपुरीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चार कोटी पन्नास लाख रूपये खर्च करून तलाव सौंदर्यीकरण करण्याचे काम थंडबस्त्यात होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. या वृत्ताने प्रशासनाला जाग आली आणि दखल घ्यावी लागली. लगेच गाळ उपसा करण्यासाठी कंत्राटदाराला अधिक निधी मंजूर केल्याने कामाला गती मिळाली.
तलावामधील खराब गाळ उपसा करण्यासाठी टिप्पर व जेसीपी लावून उपसा केल्या जात आहे. परंतु, ज्या टिप्परने हा गाठ उपसा करून दूरवर फेकला जात आहे, त्या दरम्यान डांबरीरस्त्यावर डांबराच्या ऐवजी मोठ्या प्रमाणात माती पडली आहे. मातीचे थर एकावर एक बसून वाहन गेल्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्यामुळे सौंदर्यीकरण तलावाचे जरी होत असले तरी टिळकनगर, वाल्मीकनगर, विद्यानगर, महाविद्यालय परिसर, गांधीनगर, शारदा कॉलनी येथील नागरिकांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे. संबंधित कंत्राटदार मातीची उचल ज्या टिप्परने करीत आहे, ते टिप्परचा मागील भाग खुले आहेत. त्यामुळे टिप्परमधून माती रस्त्यावर पडत असून कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)
कंत्राटदाराचे दुर्लक्ष
मुख्य कंत्राटदाराने तलावाचे काम अनेकांवर सोडून दिल्याने कामात योग्यता दिसून येत नाही. हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा असून तलाव सौंदर्यीकरणाच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल होत असल्याचे बोलले जात आहे.