डम्परखाली दबून कामगाराचा मृत्यू

By Admin | Updated: May 27, 2014 23:33 IST2014-05-27T23:33:50+5:302014-05-27T23:33:50+5:30

येथील वेकोलिच्या हिंदुस्थान लालपेठ खुल्या कोळसा खाणीत डंपरखाली दबून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खाणीच्या वर्कशॉप परिसरात घडली.

Dump worker undergoes death | डम्परखाली दबून कामगाराचा मृत्यू

डम्परखाली दबून कामगाराचा मृत्यू

घातपाताची शंका : पोलिसांकडून अधिकार्‍यांची विचारपूस

चंद्रपूर : येथील वेकोलिच्या हिंदुस्थान लालपेठ खुल्या कोळसा खाणीत डंपरखाली दबून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खाणीच्या वर्कशॉप परिसरात घडली. या घटनेने वेकोलि वतरुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळावरील एकंदर परिस्थिती लक्षात घेता हा घातपात तर नसावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांनीही त्याच दिशेने तपास आरंभला आहे.

राजू एन. कोरेकर (४८) असे मृत कर्मचार्‍याचे नाव असून तो वेकोलिच्या हिंदुस्थान लालपेठ कोळसा खाणीत ईपी फिटर या पदावर कार्यरत होता. खाणीत असलेले डंपर व ट्रकसारख्या वाहनांच्या टायरमध्ये हवा भरणे व तपासणी करण्याचे काम तो करीत होता. मंगळवारी कोळसा खाणीच्या वर्कशॉपमध्ये काम करीत असताना सकाळी ११ वाजताच्या सुमारास तो डंपर (क्रमांक ३२६५) खाली दबला. राजुच्या कमरेवरूनच डंपरचे चाक गेल्याने त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे घटनेच्यावेळी घटनास्थळावर वेकोलिचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे राजू कोरेकर डंपरखाली कसा दबला, याचा खुलासा होऊ शकला नाही. घटनास्थळावरील मृताची अवस्था पाहता, त्याच्या अंगावर डंपर चढविले असावे, अथवा टायरमध्ये हवा भरताना ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता वेकोलि कर्मचार्‍यांनी वर्तविली.

खाणीत वापरण्यात येणार्‍या डंपरला हायड्रोलिक ब्रेक लावण्यात आले आहेत. हे ब्रेक वारंवार फेल होण्याच्या घटना या कोळसा खाणीत घडत आहेत. मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर मृताचे शव अनेक तास घटनास्थळी पडून होते. डंपर मात्र तेथून हटविण्यात आले होते.त्यामुळे ही दुर्घटना आहे, की घातपात? असा प्रश्न चर्चिला जात आहे. अनेक तासानंतर वेकोलिचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचले. माहिती मिळताच, शहर पोलीस ठाण्याची चमूही घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर प्रेत शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले.

यासंदर्भात पोलिसांनी घटनास्थळावर वेकोलिचे काही अधिकारी व कर्मचार्‍यांची विचारपूस केली असता, सर्वांनीच हात झटकण्याचा प्रयत्न केला.

तूर्तास शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

घटनेनंतर इंटक युनियनच्या मागणीवरून मृत राजू कोरेकर यांच्या कुटुंबीयाला पाच लाख रुपयांची मदत तात्काळ देण्यात आली. एक महिन्याच्या आत कुटुंबातील एका सदस्याला वेकोलित नोकरी देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dump worker undergoes death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.