नैसर्गिक नाला बुजवून दुसरीकडे नाला खोदला
By Admin | Updated: February 20, 2015 00:45 IST2015-02-20T00:45:44+5:302015-02-20T00:45:44+5:30
घुग्घुस कॉलरी क्र. १ शास्त्रीनगर, आंबेडकरनगर परिसरातील शेणगाव शेतशिवार हद्दीतील जुनेद खान यांनी आपल्या मालकीच्या शेतातील नैसर्गिक नाला ..

नैसर्गिक नाला बुजवून दुसरीकडे नाला खोदला
घुग्घुस : घुग्घुस कॉलरी क्र. १ शास्त्रीनगर, आंबेडकरनगर परिसरातील शेणगाव शेतशिवार हद्दीतील जुनेद खान यांनी आपल्या मालकीच्या शेतातील नैसर्गिक नाला बुजवून शेताच्या एका बाजुला नाला काढण्याचे अवैध काम सुरू केले. मात्र काल बुधवारी नागरिकांच्या तक्रारीची नायब तहसीलदार संतोष खांडरे यांनी दखल घेऊन खोदलेला नाला जेसीबी मशीनने बुजविला आणि नैसर्गिक नाला पुर्ववत काढून देण्याचे आदेश दिले.
घुग्घुस कॉलरी क्र. १ परिसरातील शास्त्रीनगर व आंबेडकरनगर लोकवसाहत आहे. त्याच परिसराला लागून शेणगाव शेतशिवार असून जुनेद खान याची तीन एकर शेती आहे. त्या शेतात अनेक वर्षापूर्वीपासून नाला आहे. तो नाला बुझवून लोक वसाहतीच्या बाजुला जेसीबी लावून अवैधरित्या नाला काढण्याचे काम सुरू केले. या अवैध प्रकाराचा वसाहतमधील लोकांनी प्रखर विरोध केला. ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे मंगळवारी लक्ष वेधले. काम थांबविण्यास त्यांनी मज्जाव केला असता लोकांनी येथील नायब तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असता बुधवारी नायब तहसीलदार संतोष खांडरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व हे चुकीचे व अवैध काम असल्याचा ठपका ठेवून जेसीबी बोलावून नाला बुजविला आणि त्वरित शेतीतील नाला पुर्ववत करण्याचे आदेश दिल्याचे नायब तहसीलदार यांनी सांगितले.
नवीन नाल्यामुळे त्या परिसरातील वसाहतीला वर्धा नदीच्या पुराचा धोका होणार असल्याने काढलेला नवीन नाला त्वरित बुजविण्यात आला. यावेळी घुग्घुसचे तलाठी पिल्ले, शेणगावचे तलाठी उरकुडे, जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती देवराव भोंगळे, उपसरपंच निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच राजकुमार गोडशेलवार, सदस्य श्रीनिवास इशारप, ममता खैरे यासह परिसरातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)