चुकीच्या औषध फवारणीने धान पीक झाले उद्ध्वस्त
By Admin | Updated: November 4, 2015 00:49 IST2015-11-04T00:49:19+5:302015-11-04T00:49:19+5:30
कीटकनाशकाऐवजी तणनाशक औषधांची फवारणी केल्याने चार एकरवरील संपूर्ण धान पीक उद्ध्वस्त झाले.

चुकीच्या औषध फवारणीने धान पीक झाले उद्ध्वस्त
बोरगाव येथील घटना : पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड
चंद्रजित गव्हारे आक्सापूर
कीटकनाशकाऐवजी तणनाशक औषधांची फवारणी केल्याने चार एकरवरील संपूर्ण धान पीक उद्ध्वस्त झाले. हा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे घडला.
कर्ज नापिकीने होत असलेल्या बळीराजाच्या आत्महत्येचे सत्र अद्यापही सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने घडत आहे. अशातच बोरगाव येथील वंदेश फुलझेले या शेतकऱ्याने चुकून धान पिकावर कीटकनाशकाऐवजी तणनाशक औषध फवारले आणि घात झाला. स्वत: चुकीने चार एकर शेतातील पिक हातून जाण्याचे दिसताच त्याच्याही मनात आत्महत्येचा विचार घोंगावू लागला. मात्र या संकटात पत्नीने साथ दिली. ‘रडायचं नाही लढायचं....!’ असच जणू ती त्याला म्हणाली. चुका माणसाच्या हातून होतात व त्या दुरुस्तही करता येतात, असे सांगत ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. पत्नीच्या दिलेल्या या हिमतीने त्यालाही मोठे बळ मिळाले. नव्या दमाने आपली चूक दूरुस्त करण्यासाठी आता दोघांनीही मिळून कंबर कसली आहे. आत्महत्या करण्याचा विचार मनात आणणाऱ्या बळीराजासाठी उमेदाची नवी प्रेरणा देणारा हा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे समोर आला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथील वंदेश दादाजी फुलझेले यांची वढोली मार्गावर चार एकर शेती आहे. त्या शेतात तो धानाचे पीक घेतो. यावर्षी सुरुवातीला पाऊसच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिरा रोवणी केली. सामान्य परिस्थिती व सततचा दुष्काळ असतानादेखील वंदेशने कर्ज काढून चार एकर शेतात धानाची रोवणी केली. काही दिवसांत हिरवेगार धानपिक डौलात उभे होते. धानावर फवारणीची वेळ आली. वंदेशने आपल्या शेतातील धान पिकावर फवारणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी शेत बघितल्यानंतर त्याला धक्काच बसला. कारण हिरवेगार धानपिक पूर्णत: पिवळे पडले होत. धानाचे रोप पूर्णत: खराब झाल्याचे त्याच्या लक्षात आले. असे का झाले, याचा शोध घेतला असता धानावर मारण्याच्या फवारणीच्या औषधीऐवजी तणनाशक पॅरागार्ड औषधीची त्याने फवारणी केली होती. आपल्या हाताने नकळत झालेल्या चुकीने तो धास्तावून गेला. जे पिक वाढविण्यासाठी गेले दोन महिने सतत मेहनत घेतले ते आपल्या चूकीने काही क्षणातच नष्ट होण्याच्या मार्गावर आल्याने वंदेशच्या पायाखालची जमीन सरकली. तो कमालीचा निराश झाला.
कर्ज काढून रोवणी केली. परिश्रमातून शेती फुलविली. मात्र त्याच्या एका चुकीने सारे शेत डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाले. त्याच्या जीवाची घालमेल सुरू झाले. आत्महत्येचा विचार डोक्यात घोंगावू लागला. मात्र या परिस्थितीत वंदेशला त्याच्या पत्नीने सावरले. त्याला त्या मानसिकतेतून तिने बाहेर काढले.
धानावर तणनाशकाची फवारणी झाल्याने पुन्हा धानाला जिवंत अवस्थेत आणणे कठीण आहे. मात्र तरीही कृषी सहायक व गावातील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार हे पती-पत्नी पिकाला वाचवण्यासाठी जीवाचा आटापीटा करीत आहे. विविध उपाययोजना केल्या जात आहेत. एका लहानशा चुकीने वंदेशच्या मोठ्या परिश्रमावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.