भेजगाव परिसरात धानपिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: October 7, 2015 02:12 IST2015-10-07T02:12:16+5:302015-10-07T02:12:16+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

भेजगाव परिसरात धानपिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव
शेतकरी त्रस्त: कृषी विभाग उदासीन, उत्पादनात घट येण्याची शक्यता
भेजगाव: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
यावर्षी तर पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरविली. कमी अधिक झालेल्या पावसाने रोवणी उशिरा झाली. १५ दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या उष्ण- दमट वातावरणाने भेजगाव परिसरातील धानपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी पीक वाचविण्याकरिता केविलवाणी धडपड करीत आहेत.
गतवर्षी झालेली उत्पन्नातील घट आणि धानाला अत्यल्प भाव यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. मात्र यातून सावरत शेती आज ना उद्या पिकेल या आशेवर शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेच्या चकरा मारल्या. पैशाची जुळवाजुळव केली. बि-बियाणे खरेदी केले. मजुरांना मागेल ती मजुरी देऊन रोवणी आटोपली, मात्र धानपिक ऐन गर्भात असतानाच धानपिकांवर तुळतुळा, करपा, पांढरा रोग, लष्करी अळी आदी रोगांनी आक्रमण केल्याने बळीराजावर किटकनाशक फवारणीचा आर्थिक भुर्दंड बसला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीवर औषध फवारणीचा डब्बा अन् डोळ्यात अश्रुच्या धारा अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
भेजगाव परिसरातील शेकडो हेक्टर शेती आसोलामेंढा तलावाच्या पाण्याच्या भरोशावर अवलंबून आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने या तलावाची स्थिती चिंताजनक आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात नाममात्र टाकून दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जलपूजनाच्या केलेल्या स्पर्धेत शेतकरी सुखावला असला तरी या दोन्ही नेत्यांनी पुजलेले पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर वेळेवर पोहचेल काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
या परिसरात पाण्याची दुसरी सोय नसल्याने राब-राब राबुनही शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागणार आहे. आर्थिक गुंतवणूक करुनही शेतकऱ्यांची शेती पिकेल अशी शाश्वती राहिली नसल्याने शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. शासन शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवत असला तरी शेतकरी संकटात सापडला असताना प्रशानाने औषध उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाला शेतकऱ्यांशी काही देणे- घेणे नसून शासनाचे उदासिन धोरणच शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. (वार्ताहर)