रिक्त पदांमुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा भार
By Admin | Updated: November 4, 2015 00:53 IST2015-11-04T00:53:22+5:302015-11-04T00:53:22+5:30
जिल्हा सीमेवर वसलेला गोंडपिपरी तालुका हा नक्षलग्रस्त, आदीवासीबहुल तथा अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो.

रिक्त पदांमुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा भार
वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी : नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्याची व्यथा
गोंडपिपरी : जिल्हा सीमेवर वसलेला गोंडपिपरी तालुका हा नक्षलग्रस्त, आदीवासीबहुल तथा अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात तीन पोलीस ठाणे असून गोंडपिपरी येथे पोलीस ठाणे तर धाबा व लाठी येथे उपपोलीस ठाणे हे शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे काम करीत आहे. मात्र येथील पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ६० हून अधिक खेडे गावांचा समावेश आहे. तालुका सीमा ही ३० किमी अंतरापर्यंत विस्तारित असल्याने तालुक्यातील भं.तळोधी येथे पोलीस चौकी स्थापण्यात आली. या चौकीअंतर्गत २० हून अधिक गावांच्या तक्रारी, समस्यांचे निराकरण केले जाते. तसेच गोंडपिपरी हद्दीत वढोली, करंजी, धामणपेठ, चेकपिपरी व गोंडपिपरी ही मोठी गावे व आसपासची किरकोळ गावे अशी अन्य ४० हून अधिक गावांचा समावेश आहे.
या पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षकासह चार अन्य सहकारी अधिकारी व जवळपास ८० कर्मचारी असे पदे मंजूर असतानाही रिक्त पदांच्या ग्रहणामुळे आज एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक असे दोन अधिकारी व अन्य २० कर्मचारी येथे कर्तव्य पार पाडत आहेत. या व्यक्तीरिक्त कर्मचारी टपाल, कोर्ट कामकाज, उपविभागीय अधिकारी कार्यालय व अन्य कामकाज निमित्ताने कर्मचारी बाहेर असतात.
जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी होताच तालुक्याच्या सीमावर्ती भागातून काही परप्रांतीय दारू तस्करीचा गोरखधंदा चालवत आहेत. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस विभागाला हतबल झाल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तरीही येथे नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक प्रभाकर टिक्कस यांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. परिसरातील जनसामान्य, लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, सरपंच, तंमुस समित्या यांनी पोलिसांना अपेक्षित सहकार्य करून दारूबंदीच्या सक्त अंमलबजावणीस सहकार्य करण्याचे आवाहन ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.
तसेच जनसामान्यांच्या संरक्षणासाठी लढणारा पोलीस हा समाजाचा मित्र असून समाजातील वाईट वृत्ती विरोात पोलिसांना सहकार्य करून नागरिकांनी उपकृत करावे, असेही त्यांनी म्हटले. (वार्ताहर)