वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्याची दैनावस्था
By Admin | Updated: November 23, 2014 23:17 IST2014-11-23T23:17:41+5:302014-11-23T23:17:41+5:30
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत नव्याने सुरु झालेल्या गोवरी डीप या कोळसा खाणीतून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे राजुरा-गोवरी- कवठाळा मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: उखडला आहे.

वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्याची दैनावस्था
सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत नव्याने सुरु झालेल्या गोवरी डीप या कोळसा खाणीतून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे राजुरा-गोवरी- कवठाळा मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: उखडला आहे. त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले असून वाहतूक करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत विविध कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणीमुळे तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांना तोड द्यावे लागते. त्यात प्रामुख्याने वेकोलिच्या उत्खननामुळे होणारे मातीचे मोठमोठे ढिगारे व त्यामुळे कृत्रिम पुराचा फटका, होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे बसणारे हादरे व त्यामुळे घरांना जाणारे तडे, वेकोलि परिसरात होणारे धुळीचे प्रदूषण, या प्रकारामुळे परिसरातील पिकांचेही नुकसान होत आहे.
मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्खननामुळे परिसरातील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यातच महत्वाची समस्या म्हणजे कोळसा खाणीतून केल्या जाणाऱ्या ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था. मोठ्या उत्पादनामुळे वेकोलिला फायदा होत असला तरी नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वेकोलि परिसरातून राजुरा- गोवरी- पोवनी- कवठाळा हा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरुन वेकोलिची मोठी कोळसा वाहतूक होते. परिसरातील माथरा, गोयेगाव, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, धिडशी, कढोली, बाबापूर, मानोलीसह अनेक गावातील नागरिक या रस्त्याने वाहतूक करतात.
वेकोलिच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे या मार्गाची नेहमीच दयनीय अवस्था असते. वेळोवेळी दुरुस्ती केली जाते. परंतु रस्ता कधीच चांगल्या स्थितीत नसतो. सध्या वेकोलिच्या गोवारी डीप या नव्या कोळसा खाणीमुळे या मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. त्यावर होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे मोठेमोठे खड्डे पडले आहते. रस्ता पूर्णत: दबल्या गेला आहे. त्यामुळे यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांना कमालीची कसरत करावी लागते. रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अपघातांवर आळा घालण्याच्या दृष्टीने रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या मार्गावरील धुळीवर नियंत्रण करणेही गरजेचे असून रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील जनतेनी केली आहे. (वार्ताहर)